
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील लोकरंगभूमीवर क्षेत्रीय संशोधन करून लोकरंगभूमीची परंपरा, स्वरुप आणि भवितव्य सांगून पुढील संशोधकांना या क्षेत्रातील असंख्य पाऊलवाटा दाखविण्याचे मौलिक कार्य पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे सरांनी आयुष्यभर केले. त्यामुळेच माझ्यासारख्या नवख्या संशोधकांना या क्षेत्रात थोडेफार सांशोधन-लेखन करता आले. म्हणून मी सरांचा सदैव ऋणी आहे असे भावपूर्ण उद्-गार लोककला वा बोलीभाषा व कोकणातील लोककला, लोकदैवतांचे अभ्यासक डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात काढले. पद्मश्री गिरीश प्रभुणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित,पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे ह्यांच्या साहित्यावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
'पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे ह्यांचे साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक-सांस्कृतिक योगदानाचे सिंहावलोकन 'या विषयावर २८ आणि २९ सप्टेंबर,२४ ला हे राष्ट्रीय चर्चासत्र सपन्न झालं. याप्रसंगी डाॕ. लळीत म्हणाले की, 'स्वतः संकलन ,संशोधन करताना नव्या पिढीतील तरुणांना प्रेरित करणे, त्यांना सतत प्रोत्साहन देत रहाणे हा डॉ. मांडे सरांचा विशेष होता. म्हणूनच माझ्यासारखे नवखे संशोधक दशावतार, लळित, आराधी, कृषिविषयक लोकगीते अशा विषयावर काहीतरी लिहू शकले. 'गावगाड्या' बाहेरच्या लोकजीवनाचा त्यांनी अभ्यास केला. व लोककला - वाङ्मय विषयक आपली भूमिका 'लोकरंगभूमी' या ५३०पृष्ठांच्या ग्रंथातून मांडली. लोकरंगभूमी आणि भारतीय नाट्यपरंपरांचा अभ्यास करताना सिंधुसंस्कृती, भरतमूनी, वैदिक नाट्याविष्कार एवढेच नव्हे कर्मकांडातील नाट्याविष्कार, रामायण महाभारतातील नाट्य ते सांगतात व 'भारतीय नाट्याचा उदय ग्रीक नाट्यातून नाही ' हे स्पष्ट करतात. लोकधर्मी नाट्याविष्कार तसेच अभिजनांनी विकसित केलेले नाट्याविष्कार आणि लोकजीवनातील हे तीनही प्राचीन काळापासून प्रवाही असल्याचे दिसते ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली 'असे विचार डॉ.बाळकृष्ण लळीत यांनी मांडले.
या चर्चासत्रात डॉ. विक्रम कुलकर्णी, अश्विनी ठाकूर, ममता सोनवणे, सतीश अवचार ,पूनम देशमुख यांनी आपले शोधनिबंध सादर केले. अॕड, सतीश गोरडे यांनी स्वागत तर गणेश शिंदे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.