
सावंतवाडी : लोकप्रतिनिधींची आणि राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती व क्षमता नसल्यानेच आडाळीत दहा वर्षांनंतरही एकही उद्योग सुरु झाला नाही. त्यामुळे एक सक्षम दबावगट निर्माण होऊन राजकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करायला हवा, असा कठोर सूर सावंतवाडी आरपीडी विद्यालय येथे आयोजित ' आडाळी एमआयडीसी : अपेक्षा व वास्तव ' या चर्चासत्रात व्यक्त झाला.
आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समिती व 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने काल एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजक नाना कशाळीकर, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यवाह ऍड. नकुल पार्सेकर, पत्रकार शिवप्रसाद देसाई, ऍड. संदीप निंबाळकर, प्राचार्य गोविंद काजरेकर, घुंगुरकाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, कृती समिती अध्यक्ष तथा सरपंच पराग गांवकर यांचा चर्चासत्रात सहभाग होता.
यावेळी बीजभाषाणात बोलताना श्री. गांवकर म्हणाले की, एका आंतरराष्ट्रीय विमानतळापासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या औद्योगिक क्षेत्राकडे आपल्या राजकीय व्यवस्थेने खरे म्हणजे विकासाची एक अपूर्व संधी म्हणून बघण्याची गरज होती. ज्या काळात कोकणातील सर्व तथाकथित विकास प्रकल्पाना विरोध होत होता, तेव्हा आम्ही स्वतः एमआयडीसीचा प्रस्ताव तत्कालीन नेतृत्वाकडे दिला. गेली पाच वर्षे उद्योग आणावेत, यासाठी चळवळ करतं आहोत.
श्री. कशाळीकर म्हणाले की, उद्योजकांना वेळ फार जपावी लागते. गुंतवणूक मोठी असते, अशावेळी शासन, प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास त्याचा फटका बसतो. म्हणून लोकप्रतिनिधी, राजकीय व्यवस्था सक्षम व सकारात्मक लागते.
ऍड. पार्सेकर यांनी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, आपल्या एमआयडीसीत उद्योग यावेत, असे मंत्री, स्थानिक आमदार, खासदार यांना वाटतच नाही. त्यांचा प्रशासनावर अंकुशही नाही. येणारा उद्योजक कसा येणार नाही आणि आलाच तर आपला त्यात काय फायदा आहे, याची गणित मांडूनच काम केलं जात आहे. परिस्थिती कठीण आहे. पण आडाळी ग्रामस्थांनी सुरु केलेल्या चळवळीला आपण प्रोत्साहन द्यायला हवे. व्यापकता वाढवून नेल्यास बदल नक्कीच घडेल.
ऍड. निंबाळकर म्हणाले, एमआयडीसीसाठी स्थानिकांनी सुरु केलेल्या चळवळीला राजकीय व्यवस्थेकडून खो घातला जाईल. खरं तर कायद्याने एमआयडीसीच्या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार हे केंद्रीभूत करण्यात आले आहेत. त्यामुळेच स्थानिक स्तरावर काही करता येत नाही. यात आमदार आणि उद्योगमंत्री यांच्याकडे इच्छाशक्ती नसेल तर परिस्थिती फारशी बदलणार नाही.
पत्रकार श्री. देसाई यांनी ग्रामस्थांचे कौतक करत म्हटले की, आजच्या स्थितीत आडाळीत उद्योग येणे गरजेचे आहे. गोव्याकडे रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्यामुळे व्यसनधिनता, अपघात यामुळे सामाजिक प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. मध्यम स्वरुपाचे उद्योग येण्यासाठी राजकीय स्तरावर जरूर प्रयत्न व्हावेत. मात्र विविध उद्योजकांना भेटूनही प्रयत्न करावे लागतील. औद्योगिक विकासासाठी टायमिंग आणि नेतृत्वाची बांधिलकी ही गोष्ट महत्वाची असते.
चर्चासत्रास उपस्थित असलेले उद्योजक पांडू सावंत यांनी भूखंड मिळविताना अनेक अडचणी येतात. आम्ही राजकीय व्यवस्थेतील अनेकांना त्याबाबत सांगूनही काही उपयोग होत नसेल तर तरुणांनी उद्योग करावेत कसे? असा प्रश्न उपस्थित केला.
उद्योजक चंद्रशेखर देसाई यांनी राजकीय व्यवस्थेवर कठोर शब्दात टीका केली. प्राचार्य काजरेकर यांनी संवादक म्हणून काम पाहिले. सतीश लळीत यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करुन आडाळी औद्योगिक क्षेत्राची सद्यस्थिती, अपेक्षित उद्योग याबाबत माहिती दिली. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत, उद्योजक आनंद गवस यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सई लळीत यांनी केले.