वेंगुर्ला न.प.मार्फत मांडवी खाडीत कांदळवन स्‍वच्‍छता मोहीम

'स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता'अभियानांतर्गत उपक्रम
Edited by: दिपेश परब
Published on: September 23, 2024 06:34 AM
views 189  views

वेंगुर्ला : १४ सप्टेंबर २०२४ ते ०२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, या वर्षी  “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” या घोषवाक्याने अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दिनांक २२/०९/२०२४ रोजी सकाळी ७.००  वाजता मांडवी वेंगुर्ला येथे कांदळवन स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात आली.

कांदळवनं ही किनारी भागातली एक अतिशय महत्त्वाची परिसंस्था आहे. खारफुटी जंगलं का महत्त्वाची आहेत, याची तीन मुख्य कारणे आहेत.खारफुटी जंगलांमध्ये जैवविविधता आढळून येते, ही जंगलं लाखोंना उपजीविका पुरवतात आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान बदलाचा सामना करण्यासाठीही मदत करतात.  मांडवी खाडीमधील कांदळवनामध्ये जमा झालेले प्लास्टिक व इतर  कचरा गोळा करण्यात आला तसेच संपूर्ण मांडवी परिसराची देखील स्वच्छता  करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत अंदाजे ३ टन ( दोन ट्रॅक्टर) एवढा कचरा वर्गीकृत करून संकलित करण्यात आला.  

या स्वच्छता मोहीमेसाठी मुख्याधिकारी श्री परितोष कंकाळ, स्वछता दूत डॉ. धनश्री पाटील, स्वामीनी महिला बचत गटाच्या रोहिणी लोणे,रोट्रॅक्ट क्लब चे प्रितेश लाड, तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे अधिकारी/कर्मचारी, बॅ. खर्डेकर महाविद्यालय व  ग्रीन नेचर क्लब चे विद्यार्थी, स्वामीनी महिला बचत गटाच्या महिला व स्वच्छता प्रेमी वेंगुर्लावासीय नागरिक उपस्थित होते.