भाट्ये सागरी किनाऱ्याची स्वच्छता

स्वच्छता ही सेवा 2024
Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2024 07:57 AM
views 71  views

रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महसूल विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, पंचायत समिती, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स, जेएसडब्लू आणि अल्ट्राटेक सिमेंट आदींच्या संयुक्त विद्यमाने भाट्ये समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली.  'मी घाण करणार नाही आणि इतरांनाही घाण करु देणार नाही, ही शपथ सर्वांनी पाळावी. परिसर स्वच्छतेत सातत्य ठेवा', असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

 भाट्ये येथील समुद्र किनारा आज स्वच्छ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, मुख्याधिकारी तुषार बाबर, सरपंच प्रीती भाटकर, जेसडब्लूचे आशिष मुसळे, फिनोलेक्सचे नरेश खरे, अल्ट्राटेकचे चंद्रशेखर उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, स्वच्छता ही सेवा, या मोहिमेंतर्गत सागरी किनाऱ्यांची स्वच्छता होत आहे. यामध्ये सातत्य राहीले पाहिजे. परिसर मी घाण करणार नाही आणि इतरांनाही घाण करु देणार नाही, या प्रतिज्ञेप्रमाणे सर्वांनी नियमित स्वच्छता ठेवावी. सागर किनारे हे आपले प्रमुख पर्यटन स्थळं आहेत. ते स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी स्वच्छता ही सेवा  2024, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या लोगोचे प्रकाशन करण्यात आले. स्वच्छता संदेश देऊन फलकावर स्वाक्षरीही करण्यात आली.

 गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली. यानंतर भाट्ये समुद्र किनारा उपस्थितांनी 2 तासांच्या श्रमदानानी स्वच्छ केला.  त्याचबरोबर 10 नारळाचे वृक्षारोपण करण्यात आले. 100  मीटर धावण्याच्या स्पर्धा घेऊन उत्तम आरोग्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. विजेत्यांना दालचिनी आणि नारळाचे रोप देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा कोषाधिकारी प्रविण बिराजदार, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सहायक नियोजन अधिकारी सुचित वंजारे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस जवान आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.