
सावंतवाडी : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मानून सावंतवाडी मतदारसंघातील जनसेवा सतत चालू आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद संघातील जनतेसाठी ६ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्याचा लोकार्पण सोहळा २६ सप्टेंबर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले शहर व विविध प्रमुख जिल्हा परिषद मतदार संघात या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिकांची सेवा ही उत्तम दर्जाची असणार असून २४ तास या रुग्णवाहिका रुग्ण सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. या पिढीचे संरक्षण कवच म्हणून या रुग्णवाहिका जनतेच्या सतत सेवेत राहतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मी हे कार्य कोणत्याही स्वार्थातून करत नाही. मी या मतदारसंघांचे कार्यक्षेत्र हे राजकारणासाठी नाही तर समाजसेवेसाठी निवडलेले आहे. इथल्या लोकांच्या डोळ्यात मला ते समाधान पहायचे आहे, जेव्हा त्यांची पुढची पिढी ही याच ठिकाणी चांगला रोजगार मिळवून आर्थिक श्रीमंती प्राप्त केलेली असेल. चांगल्या रोजगारामुळे आरोग्याचे प्रश्न हे त्यांच्या आर्थिक कवेत सहजपणे येतील.सर्वच ज्येष्ठ मंडळी, महिला, युवा सर्वांचे आरोग्य अबाधित राहो, खणखणीत राहो अशी माझी नेहमीच भावना असेल, आणि त्या आरोग्याच्या मार्गात जे काही संकट येईल त्याचे प्रत्येकवेळी सुखरूप निरसन या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होवो अशी प्रार्थना मी विघ्नहर्ता गणेशाकडे करतो अशी भावना विशाल परब यांनी व्यक्त केली. यावेळी अॅड. अनिल निरवडेकर व बांदा माजी सरपंच अक्रम खान आदी उपस्थित होते.