वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष प्रसन्ना उर्फ पपू कुबल यांचे निधन

Edited by: दिपेश परब
Published on: September 16, 2024 18:13 PM
views 716  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा प्रसिद्ध आंबा बागायतदार वेंगुर्ले कुबलवाडा येथील रहिवासी प्रसन्ना उर्फ पपू कुबल ( 55) यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कुबल यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. 

    वेंगुर्ले शहरात सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. शिवम फाउंडेशनचेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम शहरात राबवले होते. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या पर्यटन महोत्सवाची आजही शहरात चर्चा होते. वेंगुर्ले शहर राष्ट्रीय पातळीवर झळकल, नगरपरिषद देशात अव्वल ठरली यात त्यांचा मोलाचा वाटा होत. अवघ्या अडीच वर्षाच्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या सोबत  शहरात स्वच्छतेची चळवळ उभी केली होती. आणि याचीच प्रचिती म्हणून आज कोट्यवधींची बक्षिसे वेंगुर्ले नगरपरिषदेला मिळून नगरपरिषद देशात अव्वल ठरली. 

    सन २००० पासून प्रसन्ना कुबल व त्यांच्या पत्नी स्नेहा कुबल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरात झपाट्याने सामाजिक कार्य सुरू केलं. यानंतर सलग दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. याच दरम्यान २०१४ साली त्यांना अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. या कालावधीत त्यांनी राबवलेल्या स्वछतेच्या चळवळीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगरपरिषदेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करून आपलं सामाजिक कार्य पुढे सुरू ठेवल. वेंगुर्ले नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. भाजपच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा स्नेहा कुबल यांचे ते पती होत. तर जिल्हा बँक माजी संचालक नितीन कुबल व माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल यांचे ते दिर होत.