वेंगुर्ला : गावागावात जाणाऱ्या एसटी बस च्या दैनंदिन ज्या फेऱ्या आहेत त्या गेले काही दिवस बंद असल्याने गणेशोत्सव काळात नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या १० व ११ व्या दिवशी ज्या दैनंदिन फेऱ्या आहेत त्या सुरू करा अन्यथा नागरिकांना घेऊन एसटी डेपोला धडक देणार असल्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी आगर व्यवस्थापक कुंभार यांची भेट घेऊन दिला आहे.
गेले काही दिवस गावागावातील काही एसटी बस फेऱ्या बंद असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव काळात प्रवास करणाऱ्या चाकरमानी तसेच नागरिकांना याचा फटका बसत आहे. याची दखल घेत यशवंत परब यांनी आगर व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा केली. दरम्यान गणेशोत्सवामुळे काही गाड्या या मुंबईला रवाना झाल्यामुळे गाड्यांची कमतरता असून ज्या वस्तीच्या एसटी बस आहेत त्या सोडुन इतर फेऱ्या सुरू करण्यात येतील व गणेशोत्सव नंतर पूर्वी प्रमाणे सर्व एसटी फेऱ्या सुरू होतील असा शब्द यावेळी आगर व्यवस्थापक यांनी यशवंत परब यांना दिला.