
दोडामार्ग : पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्या कर्नाटकमधील पर्यटकांच्या कारचा आंबेली येथे कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात थेट घळणीत कोसळल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने कारमधील सर्व पर्यटक सुखरूप आहेत. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कर्नाटक राज्यातील काही पर्यटक गोव्याकडे जाण्यासाठी दोडामार्ग मार्गे प्रवास करत होते. दरम्यान दोडामार्ग ते वीजघर या राज्य मार्गावरील आंबेली परिसरात चालकाचा अंदाज चुकल्याने कार विरुद्ध दिशेला गेली आणि थेट रस्त्यालगतच्या घळणीत कोसळली. अपघातस्थळी माती असल्याने कार लगतच्या विद्युत खांबावर आदळण्यापासून थोडक्यात बचावली. मात्र रस्त्यालगत लोंबकळणाऱ्या दूरसंचारच्या तारांना कार लागल्याने त्या तुटल्या. सध्या आंबेली येथे एका मोरीचे काम सुरू असून संबंधित ठेकेदाराने कोणतेही सूचना फलक किंवा इशारे लावले नसल्याने चालकास रस्त्याची योग्य माहिती मिळाली नाही आणि त्यामुळेच अपघात झाल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. तर काही नागरिकांनी चालकाला डुलकी आल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.










