शिक्षक दिनीच अन्याय दिन आंदोलन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 05, 2024 13:37 PM
views 28  views

सिंधुदुर्गनगरी :    एक नोव्हेंबर 2005 पूर्वी अर्धवेळ विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा. एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी यासह सुमारे 18 मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने गुरुवारी शिक्षक दिनी अन्याय दिन असल्याचे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

    शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकट्टे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसलेले व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आपण आश्वासित मागण्यावरून निर्णयांची अंमलबजावणी करीत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने पूर्वी दिलेल्या इशारा पत्रानुसार यावर्षीच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यावर्षी शिक्षक दिन "अन्याय दिवस" म्हणून या दिवशी आंदोलन करून सरकारच्या निषेधार्थ राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना धरणे धरून निवेदन देणार आहेत. असे नमूद केले असून, आपल्या विविध मागण्या यामध्ये नमूद केल्या आहेत. यात एक नोव्हेंबर 2005 पूर्वी अर्धवेळ विना तसे अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ घ्यावा. एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी, मान्यता प्राप्त आयटी शिक्षकांच्या समायोजना बाबतचा शासन आदेश त्वरित निर्गमित करण्यात यावा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी निवड श्रेणीसाठीची 20% अट रद्द करावी यासह सुमारे 18 मागण्या या निवेदनात आहेत.