सिंधुदुर्गनगरी : बहुतांशी अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता असते मात्र जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना प्रवासात ते माझ्यासोबत असताना त्यांना भजनी कलावंतांचे महत्त्व सांगितले व या भजनी मंडळांसाठी भजने साहित्य पुरवण्याची सूचना केली व या अधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ही योजना सुरू झाली. यावर्षी २९७ जिल्ह्यातील भजनी मंडळांना भजनी साहित्य पुरविले जात आहे. जिल्ह्यातील भजनी मंडळ किंवा भजनी कलाकार भक्ती रंगाची उधळण करत असताना समाजाला जोडून ठेवत असतात त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व भजनी मंडळाचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्ह्यातील २९७ भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
कोणतीही योजना राबविण्यासाठी अधीकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लागतो. अशीच एक योजना टेली मेडिसिन या जिल्हात सुरु केली. या योजनेतून जिल्हातील 33 हजार रुग्ण सल्ला व औषध उपचार घेत आहेत. ही योजना ही जिल्हातील गरीब रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणारी चांगली योजना असल्याचे रवींद्र चव्हाण म्हणाले.
त्याच ठेकेदाराकडून साहित्य खरेदी, जि. प. चा गुपचूप कार्यक्रम
भजनी मंडळांना साहित्य पुरविन्याच्या योजनेत यावर्षी 31 लाख 99 हजार खर्च करण्यात आले. यातून मृदंग, टाळ,झान्ज अशा साहित्याचे वितरण करण्यात आले. गेल्या वर्षी वाटप करण्यात आलेले हे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत अनेक मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर्षीचे साहित्य त्याच ठेकेदाराकडून घेतल्याचे सांगण्यात येते.