
सावंतवाडी : माडखोल धरणात कोलगाव येथील युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला असून घटनास्थळी युवकाची इलेक्ट्रिक दुचाकी ,चप्पल आणि मोबाईल आढळून आले. तसेच घरात आत्महत्येबाबत चिठ्ठी लिहून ठेवल्याने या घटनेला अधिकच दुजोरा मिळाला आहे. मात्र सकाळपासून धरणात रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम घेऊनही मृतदेह आढळून न आल्याने या घटनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कोलगाव भोमवाडी येथील एक युवक मंगळवारी दुपार पासून घरातून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु होता. सावंतवाडी पोलिस ठाण्यातही बेपत्ताच नोंद करण्यात आली आहे. त्यातच घरात लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याने नऊ जणांची नावे लिहून आपल्या आत्महत्येला जबाबदार ठरविले आहे. दरम्यान आज सकाळी इलेक्ट्रिक दुचाकी मोबाईल व चप्पल माडखोल धरणावर आढळून आली. त्यामुळे त्याने धरण्यात आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. याबाबत पोलिसांना कल्पना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह हेड कॉन्स्टेबल मनोज राऊत व अन्य कर्मचाऱ्यांनी दाखल झाले. सांगेली येथील बाबल अल्मेडा रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत धरणाच्या पाण्यात शोधमोहीम राबवूनही उशिरापर्यंत मृतदेह हाती न लागल्याने अखेर ही मोहीम थांबवण्याचा निर्णय पोलीस निरीक्षकांनी घेतला.
याबाबत पोलिस निरीक्षक म्हणाले, आपल्याकडे केवळ बेपत्ताची नोंद असल्याचे सांगितले. मात्र घरातील आढळलेल्या चिठ्ठीबाबत त्यांनी अधिक बोलण्यास टाळले. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या चिठ्ठीमध्ये संबधित युवकाने आपण जानेवारी महिन्यामध्ये माझ्या ओळखीने मित्राला चार चाकी गाडी भाड्याने दिली होती. त्या गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडीच्या नुकसान भरपाई साठी संबंधित गाडी मालकाने माझ्याकडे पैशाचा तगादा लावला होता. त्याला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याने आपण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले असल्याचे सांगितले. शिवाय माझ्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या सर्वांना त्यांच्या पापाची शिक्षा द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. चिट्टीमध्ये 9 जणांची नावे आहेत काहींची नावे अर्धवट आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांना विचारले असता त्यांनी चिट्ठी संदर्भात आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगून त्यावर जास्त बोलण्याचे टाळले. मात्र चिठ्ठीतील पैशाचे कारण पाहता युवकाने आत्महत्या केली की तो एक बनाव आहे बाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. मृतदेह हाती लागल्यानंतर या प्रकारावर पडदा पडणार आहे.