
दोडामार्ग : 'घुंगुरकाठी' सेवाभावी संस्थेने कळणे हायस्कूलच्या सहकार्याने कळणे येथे आयोजित केलेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत माध्यमिक गटात नेमळे हायस्कूलने आणि प्राथमिक गटात कळणे हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत उत्साही वातावरणात झालेल्या या स्पर्धेत प्राथमिक गटात 10 आणि माध्यमिक गटात 12 संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमुळे कळणे हायस्कूलचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारून गेला होता.
सकाळी दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने स्पर्धेला प्रारंभ झाला. सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित असलेल्या या स्पर्धेत दोन्ही तालुक्यातील २२ संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा: प्राथमिक गट: प्रथम - नूतन विद्यालय, कळणे, द्वितीय- नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, नेमळे, तृतीय- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाळ्ये, माध्यमिक गट: प्रथम- नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, नेमळे. द्वितीय- न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी, तृतीय- एम आर नाईक विद्यालय, कोनाळकट्टा.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत, सचिव डॉ. सई लळीत, मुख्याध्यापक एम. व्ही. देसाई, आडाळी सरपंच पराग गावकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई, परीक्षक संजय आठल्ये (कुडाळ), मंजिरी धोपेश्वरकर (सावंतवाडी), दत्तू गांवस (साखळी, गोवा) आदी मान्यवर उपस्थित होते.
पारितोषिक वितरण समारंभावेळी परीक्षकांच्यावतीने संजय आठल्ये यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, समुहगीत गायन स्पर्धेत गीताची निवड, सादरीकरण आणि स्वर, ताल खुप महत्त्वाचे असतात. गाण्याचा आशय सादरीकरण व चेह-यावरील हावभावातून व्यक्त झाला पाहिजे. शब्दोच्चारांवरही विशेष लक्ष देण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.
आडाळी सरपंच पराग गावकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, एकेकाळी अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत असत. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण नगण्य झाले आहे. समुहगीत गायन हा केवळ श्राव्य प्रकार नसून तो दृक-श्राव्य आहे. आज देशभरात जे झुंडशहीचे वातावरण पसरले आहे, त्यावर मात करुन खरी देशभक्ती भावना रुजवणा-या अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत.
डॉ. सई लळीत यांनी प्रास्ताविकात स्पर्धा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी सतीश लळीत, संपदा देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संगीत शिक्षक व्ही. एम. गोसावी, विठ्ठल दळवी, भरत दळवी, विश्वनाथ सावंत (मुख्याध्यापक, कोनाळकट्टा), उमेश देसाई, सतीश धरणे, संजय तायवाडे, राजश्री देसाई, मधुकर गावकर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी परीश्रम घेतले. स्पर्धेचे स्थानिक व्यवस्थापन नूतन विद्यालय कळणेचे मुख्याध्यापक एम. व्ही. देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोखपणे केले. स्पर्धेत नेमळे, सावंतवाडी, ओटवणे, बांदा, आरोस, दोडामार्ग, भेडशी, पाट्ये, पाळ्ये, कुडासे, कोनाळकट्टा, सोनावल येथील प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालये सहभागी झाली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उमेश देसाई यांनी केले.