
दोडामार्ग : विद्यामंदिर घोटगेवाडी येथे विद्यार्थी, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच अनेक शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. प्रशालेच्या मुलांनी राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत सादर केले. त्याचबरोबर शाळेच्या आवारात 'मुळदे कृषी महाविद्यालया'च्या विद्यार्थ्यांनी साकार केलेली भारत देशाच्या नकाशाची प्रतिकृती हे विशेष आकर्षण ठरले.
तसेच आजच्या या दिवसाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे मुंबई स्थित "हमारा स्वाभिमान भारत" या संस्थेकडून पुरस्कृत केलेल्या चित्रकला व वेशभूषा स्पर्धा .या संस्थेच्या प्रमुख प्रिया शेंडे यांनी शाळेत स्पर्धा घेण्यासाठी या संस्थेमार्फत सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. घोटगेवाडी सारख्या ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या या दोन्ही स्पर्धांमुळे मुले अतिशय प्रोत्साहित झाली.
या स्पर्धांमध्ये प्रशालेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना या संस्थेकडून प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या. सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले.
'हमारा स्वाभिमान भारत' या संस्थेने या घोटगेवाडी गावात आणि प्राथमिक शाळेत गतवर्षीपासून विविध उपक्रम राबविले असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी भविष्यातही या ठिकाणी असे अनेक उपक्रम राबविण्याचा मानस श्रीम. प्रिया शेंडे मॅडम यांचा आहे.
अशाप्रकारे विद्यार्थी हित जोपासण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या या संस्थेच्या प्रमुखांचे तसेच इतर सर्वांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले.