
मालवण : गणेशोत्सवा निमित्त सप्टेंबर महिन्याचे धान्य व शासनाकडून घोषित झालेला आनंदशिधा ऑगस्ट महिन्यामध्ये आगाऊ स्वरूपात मिळावा या धान्य व केरोसीन दुकानदार संघटनेच्या मागणीची भाजपने दखल घेत माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तांत्रिक सुधारणा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण गणेश चतुर्थीपूर्वी धान्य वितरणाचा प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली यांना दिले.
गणेशचतुर्थी हा सण कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून मानला जातो. लाखो चाकरमानी मुंबईहून कोकणामध्ये गणपती सणानिमित्त येतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आधीचे आठ दिवस साऱ्यांची घाईगडबड असते. यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी असल्यामुळे कार्डधारकांना गणेश चतुर्थीपूर्वी धान्य मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ते धान्य आगाऊ स्वरूपात म्हणजे सप्टेंबर 2024 या दोन महिन्याचे धान्य व शासनाकडून घोषित केलेला आनंदशिधा माहे ऑगस्ट 2024 महिन्यामध्ये मिळावा. तसेच ई पॉज मशीनवरही ऑगस्ट 2024 आणि सप्टेंबर 2024 या महिन्याचे धान्य ऑगस्टमध्ये एकत्रित कार्डधारकाच्या एकाच अंगठ्याने पावती बनवण्याची सुविधा उपलब्ध करावी. जेणेकरून ग्राहकाला दोन्ही महिन्याचे धान्य एकाच वेळी देता येईल व सर्व्हरवरतीही जास्त ताण येणार नाही. लोकांना गरजेच्यावेळी म्हणजे गणेश चतुर्थीपूर्वीच सप्टेंबर 2024 महिन्याचे सुद्धा धान्य लोकांच्या घरामध्येपोच होईल अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली होती.