
सावंतवाडी : सावंतवाडीतील वेंगुर्ला बस स्थानकातील प्रसाधनगृह लोखंडी जाळी ठोकून बंद करण्यात आले होते. यामुळे स्थानावरुन नेहमी प्रवास करणारे असंख्य विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व स्थानिक व्यापारी यांची गैरसोय होत होती. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने अधिक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने अवघ्या चार दिवसांमध्ये सावंतवाडी नगरपरिषद, आगार व्यवस्थापक व स्थानिक व्यापाऱ्यांच्या सहकार्याने प्रसाधनगृह दुरुस्ती करून ते पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणले आहे.
यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व राजू मसुरकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे स्वच्छता अधिकारी दीपक म्हापसेकर व पांडुरंग नाटेकर यांचे सहकार्य मिळवून दिले. सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, रूपा मुद्राळे, सुजय सावंत यांनी स्वतः स्वच्छता मोहीम राबवून नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रसाधनगृहाची साफसफाई केली. सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील यांच्याकडून दोन्ही दरवाजांना ग्रील लावून दिली. प्रसाधनगृह दर दिवशी साफ ठेवण्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांनी स्वीकारली. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हे प्रसाधनगृह पुन्हा प्रवाशांच्या सेवेस उपलब्ध झाले आहे. याप्रसंगी आगार व्यवस्थापक निलेश गावित, सहाय्यक व्यवस्थापक संदीप मोहिते, स्थानक प्रमुख विशाल शेवाळे, अरुण पवार व वाहतूक नियंत्रक तेजस तारी, श्याम हळदणकर, शैलेश नाईक, हेलन निबरे उपस्थित होते. या कार्यासाठी आगार व्यवस्थापक यांनी सामाजिक बांधिलकी संस्थेला आभार पत्र देऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे आभार मानलेत.