
सिंधुदुर्ग : रिकामा झाला पाट, रिकामा झाला मखर, पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला लंबोदर. ज्या गणरायाच्या आगमनासाठी महिनाभर आधीपासून तयारी सुरू होती त्या गणरायाला निरोप देताना कोकणवासीयांचे डोळे आपसूकच पाणवतात. शनिवारी पाच दिवसांच्या घरगुती गणराला भक्तिभावाने निरोप दिल्यानंतर कोकणातील घराघरात असाच काहीसा प्रसंग पहायला मिळाला.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव. कोंकणी माणूस जिथे असेल तिथून गणपतीला दुर्वा वहायला कोकणातील आपलं घर गाठतोच. जगात दरवर्षी सर्वांत मोठं स्थलांतर हे कोकणातील गणेशोत्सवातच होत असेल यातt कोणतीही शंका नाही. विशेषतः कोकणस्थ मुंबईकर चाकरमानी गणपतीत सुट्टी काढून येतात. ती नाही मिळाली तर नोकरीवर लाथ मारून गावी येतात. गणेशोत्सवात गावी येण्यापासून कोणतीच ताकद त्यांना रोखू शकत नाही. घरी आल्यावर साफसफाई, शेण सारवणी पासून गणपती आगमना पर्यंत त्यांचा उत्साहाला पारावार उरलेला नसतो. लाडक्या गणरायाच्या आरती, भजनात ते दंग झालेला असतात अन् शेवटी नकोसा वाटणारा निरोपाचा दिवस येतोच. लाडका बाप्पा आपल्या घरी जातो. पाट, मखरासह भरलेलं घर रिकामं होऊ लागतं. कामाधंद्यासाठी रोजगारासाठी गावाबाहेर गेलेल्या लेकरांचा परतीचा प्रवास सुरू होतो. घरी उरतात ते वयस्कर आजी-आजोबा. कोकणातील घराघरात साधारण हीच परिस्थिती पहायला मिळते.
सध्या असाच एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा फोटोच खुप काही सांगून जात आहे. यासोबतचा मजुकरही डोळ्यांच्या कडा ओल्या करून जातो. ''गणपती गेले, चाकरमानी निघाले. नातवंड पतवंडांनी भरलेलं घर पुन्हा एकदा रिकामे झाले. कोकणातील प्रत्येक आजोबा आज एकटेच दाराबाहेर पाहात असतील. "बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या" असं गणरायाला साकडं घालत असतील. निघताना पाणावलेल्या डोळ्यांनी 'सावकाश जावा रे. घरी पोचल्यावर फोन करा' असं म्हणणाऱ्या सर्व आजी आजोबांना देव उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना'' असा हा मजकूर अन् फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच शेअर होतोय. 'देवाक काळजी' असं वाक्य देखील फोटोत पहायला मिळतंय. पोटापाण्यासाठी कोकणी माणूस जन्मभूमी सोडून बाहेर जातो. गणेशोत्सवाच्या निमित्तानं का असेना तो गावी येतो, आपल्या लोकांत मिसळतो. वर्षांतून काही दिवस मुलबाळ, नातवंड आजी-आजोबांच्या सहवासात येतात. सुख, समाधान, आनंदाच्या क्षणात रंगून जातात. पण, शेवटी जबाबदारीची जाणीव होतेच. रोजगाराची ही भूक जागी होते. जन्मभूमीतच ही भूक भागली तर आपला माणूस आपल्या सोबतच राहील. गणरायाच्या कृपेनं तो दिवसही लवकर येवो एवढीच प्रार्थना.