सिंधुदुर्गनगरी : शासन जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. स्थानिक पातळीवर अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. नियोजन सभागृहात नवनियुक्त जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी व्यासपीठावर प्रभारी अपर जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, श्रीमती देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, सामान्य माणसांच्या समस्या सोडविणे हे प्रशासनाचे प्रथम प्राधान्य आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेला नियमित भेटावे, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणे हे प्रत्येक अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. शासन राबवित असलेल्या विविध योजना आणि सेवांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.