कीर्तनकार भाऊ नाईक यांचा 'कीर्तन अलंकार' पुरस्काराने सन्मान

Edited by:
Published on: February 03, 2024 13:35 PM
views 71  views

सिंधुदुर्गनगरी : वेतोरा, वेंगुर्ले येथील कीर्तनकार विश्वनाथ मंगेश तथा भाऊ नाईक यांना श्रीहरीकीर्तनोत्तेजक सभा, पुणे यांनी त्यांच्या महर्षि वेेदव्यास कीर्तन संमेलनात कीर्तन अलंकार हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. ह.भ.प. भाऊ नाईक बुवांच्या कीर्तनाचे सभेच्या वतीने शुक्रवार 02 फेब्रुवारी रोजी श्री नारद विद्यामंदिर पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.

कीर्तन क्षेत्रातील अडीज तपांच्या योगदानाबद्दल श्री. नाईक यांचा हा गौरव आहे. श्री नाईक यांनी सुरुवातीचे शिक्षण ह.भ.प.श्री. दाभोळकर गुरुजी, वेंगुर्ले यांचेकडून घेतले तर गेली पंधरा वर्षे ते सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री. हरिहर नातू बुवा यांचेकडून मार्गदर्शन घेत आहेत.

ताल, सूर आणि वक्तृत्व यांचा सुंदर मिलाफ श्री. नाईक बुवा यांच्या कीर्तनात असतो. स्थानिक मालवणी भाषेचा लहेजा, प्रतिपाद्य विषयाला साजेसे किस्से, उदाहरणे, लोकरंजनासाठी माफक विनोद आणि पूर्वरंग आणि उत्तररंग यातील विषयांची सुसूत्रता श्रोत्यांच्या मनाची पकड घेते. यवतमाळ,उगार, बदलापूर याबरोबरच सिंधुदुर्गातील मालवण येथील कीर्तन पंचक, कल्याणमधील याज्ञवल्क्य आयोजित कीर्तन समारोह, केशव सेवा समिती आयोजित हैदराबाद येथील कीर्तन महोत्सव, श्री क्षेत्र माणगाव अशा विविध स्थानी त्यांनी जनमानसावर आपल्या कीर्तन कलेचा ठसा उमटविला.रसिक श्रोत्यांच्या आशीर्वादांनी ही महत्त्वाची मजल शक्य झाली अशी भावना श्री. नाईक बुवा यांनी व्यक्त केली. त्यांच्या अद्वितीय कला आणि निष्ठेचेही हे फळ आहे. श्री भाऊ नाईक यांनी त्यांच्या या अप्रतिम यशाने आपल्या समूहाचा आणि समाजाचा गौरव वाढविला आहे.