किरण सामंत यांना घेतलं खांद्यावर | कार्यकर्त्यांनी उमेदवार घोषित कराच्या दिल्या घोषणा

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 04, 2024 14:23 PM
views 1145  views

रत्नागिरी  :  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा तील भाजप आणि शिवसेना पक्षाकडून नेमका उमेदवार कोण याची घोषणा अजून करण्यात आली नाही आहे आज शिवसेना पक्षाची बैठक रत्नागिरी येथे मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल विवेक येथे आयोजित केली आहे. आपल्या नेत्याला खांद्यावर उचलून घेवून जल्लोषात उमेदवार म्हणून घोषित करा, अशी हाक देत शिवसेना पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांच्या नावाचा रत्नागिरीत आज एल्गार केला. हॉटेल विवेक येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन खऱ्या अर्थाने दिसून आले. मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आणि राहुल पंडित या दोघांनी महायुतीचा उमेदवार निवडून येईल आणि तो शिवसेनेचा असेल, असे सांगत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यासोबत अनेक समर्थकांनी उपस्थिती लावली होती. मंचावर अग्रस्थानी राजन शेट्ये, बिपिन बंदरकर, बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, सुदेश मयेकर, गजानन पाटील, अल्ताफ संगमेश्वरी, अभिजीत गोडबोले, सुहेल मुकादम असे अनेक कार्यकर्ते होते. कार्यकर्त्यांचा एकच निर्धार होता.. किरण सामंत यांना शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळालीच पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून आपण त्यांच्याकडे साकडे घालण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार केला आहे

यावेळी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, माझा मोठा भाऊ लोकसभेत जावा, ही माझी भावना आहे. आज शक्तीप्रदर्शन करायचे असते तर चंपक मैदान भरुन उपस्थिती दिसली असती. येथे हजारों कार्यकर्त्यांची ताकद असलेला कार्यकर्ता आहे, येथे बूथप्रमुख किंवा विभागप्रमुख नाहीत तर लोकांसाठी झपाटून काम करणारा कार्यकर्ता आहे. महायुतीचा उमेदवार कोणीही असो, आम्ही काम करु असा विश्वास सिंधुदुर्गने दाखविला आहे. तसा विश्वास आम्हालाही दाखवायचा आहे. मतदारसंघाचे वातावरण पहाता धनुष्यबाण निवडून येवू शकतो आणि अशी भावना आम्ही कळविली आहे, असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यावेळा टाळ्यांचा कडकडाट झाला.