
सिंधुदुर्ग : किरण सामंत शिवसेनेचे बलाढ्य अस्त्र. उदय सामंत यांच्या राजकारणातला अदृश्य चाणाक्ष. या चाणाक्षाला जर धनुष्यबाण याच चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची संधी दिली तर काय चित्र असेल रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात याच्या बऱ्याच चर्चा आता रंगू लागल्या आहेत. मात्र त्यांच्या धनुष्यबाण चिन्हाला राणे आणि भाजपाची ताकद मिळाली तर मात्र ते हमखास विजयाचा धनुष्य बाणाने अचूक वेध साधतील असा ठाम विश्वास आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटू लावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ गेली दहा वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या ताब्यात आहे. दोन वेळा ते या मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हावर खासदार म्हणून निवडून गेलेत. पण सध्याच्या राजकारणात दलबदल झाल्याने आणि पक्षाची चिन्हे देखील बदलल्याने आता रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेसाठी विनायक राऊत तर उमेदवार आहेत पण भाजप आणि शिंदे शिवसेनेचा ठरणारा उमेदवार हा एक तर कमळ किंवा धनुष्यबाण या निशाणीवर लढणार आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी निश्चित झाली तर ते कमळ या निशाणीवर निवडणूक लढवतील. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेकडून किरण उर्फ भैय्या सामंत यांना उमेदवारी मिळाली तर मात्र ते मूळ शिवसेना आणि निशाणी धनुष्यबाण या चिन्हावर लढवतील. साहजिकच वर्षानुवर्षे मतदार ज्या चिन्ह आणि पक्षाशी जोडले आहेत त्यांचा आणि या चिन्हाचा सामंत यांना मोठा फायदा होईल. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपचे सर्वच पदाधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले तर त्यांचा विजय अधिक सोपा होईल.
रत्नागिरी जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघ असून राजापूर मध्ये 232411 मतदार रत्नागिरी 281630 मतदार, चिपळूण मतदारसंघांमध्ये 268270 मतदार असे एकूण रत्नागिरी विधानसभा 782311 मतदार आहेत. राजापूर मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी असले तरी सामंत यांची पकड या मतदारसंघांमध्ये आहे. रत्नागिरी मतदारसंघ उदय सामंत यांच्या ताब्यात असल्याने त्यांना कोणतीच भीती नाही. चिपळूण मतदारसंघांमध्ये सामंतांचे मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि चिपळूण यामध्ये सामंत बऱ्यापैकी मतं घेण्याची शक्यता आहे.
तसेच सिंधुदुर्ग मध्ये 3 विधानसभा येतात कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी या विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार-328307
महिला मतदार -329473 एकूण मतदार -657780 यामध्ये कणकवली हा आमदार नितेश राणे यांचा बालेकिल्ला आहे म्हणजेच भाजपचा बालेकिल्ला आहे. कुडाळ मालवण मध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असून भाजपचे निलेश राणे यांची पकड या कुडाळ मालवण तालुक्यामध्ये असल्याने त्याचा फायदा सामंत यांना होऊ शकतो.
राहिला प्रश्न सावंतवाडी मतदार संघाचा तर तो दीपक केसरकर हे शिंदेच्या सेनेमध्ये मंत्री आहेत ते आपल्या पक्षाचा खासदार निवडून येण्यासाठी मोठी मेहनत प्रामाणिकपणे घेतील यात मात्र कोणती शंका नाही. त्यामुळे जर किरण सामंत यांनी धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवली तर जिंकण्याची शक्यता दाट आहे.