
सावंतवाडी : निरवडे गावात एका कंपनीच्या माध्यमातून आर्थिक फायद्यासाठी स्थानिक गोरगरीब लोकांना फसविण्याचा प्रकार श्रीमती लक्ष्मण गावडे यांच्याकडून सुरु आहे. तसेच त्यांच्या पतीकडून ग्रामपंचायत मधील पदाधिका-यांना, कर्मचा-यांना,गावातील व्यक्तींना धमकी देण्याचे प्रकार केलेले आहेत. गावातील विकास कामांना अडथळे निर्माण करीत आहेत त्यामुळे अशा प्रवृत्तींना आळा घाला अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नागेश गावडे यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी आज सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांच्याकडे दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की,आतापर्यंत बर्याच लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे. एका कंपनीने गावागावात प्रतिनिधी नेमून श्रीमती गावडे यांनी स्थानिक महिलांना युवकांना फसविले आहे. विविध आमिषे दाखवून गोरगरीब लोकांकडून पैसे उकळले आहेत. या ठिकाणी सभासद नोंदणी पूर्ण करा असे सांगून लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे. तसेच त्या कंपनीच्या माध्यमातून दोनशे सभासद पूर्ण केल्याने प्रतिनिधींचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर गावात लावण्यात आले आहेत. मात्र हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे याबाबतची माहिती व पुरावे आपण जमा केले आहेत. निरवडे गावासह पंचक्रोशीतील लोकांना अशाप्रकारे गंडा घातला आहे. श्रीमती गावडे व तिचे पती लक्ष्मण गावडे हे धमकावत असल्याने त्यांना घाबरून लोक त्यांच्यावर तक्रार देण्यास घाबरतात. तसेच सरकारी कामात अडथळा, अॅट्रॉसिटी अशा कायद्याअंतर्गत संबंधितांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तरी सुद्धा त्यांच्याकडून गावात अशा प्रकारचे काम सुरू आहे. गावातील वातावरण सुद्धा बिघडविण्याचा प्रकार त्यांच्याकडून होतो. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.