
सावंतवाडी : मागील आठवडाभर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मनसेच्या कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र चालू असून मनसेचे माजी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी पक्ष सदस्याचा राजीनामा दिल्यानंतर संघटनेत उभी फूट पडलेली दिसून येत आहे.
मनसेतील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे मनसे विद्यार्थीसेनेची युवा फळी संघटनेपासून दूर जाणे पक्षाला हानिकारक ठरणार आहे. नुकतेच मनसे विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनीही राजीनामा दिला होता. तर आता सावंतवाडी विधानसभेतील व तालुक्यातील विद्यार्थीसेनेचे जिल्हा सचिव निलेश देसाई, उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक, सावंतवाडी तालुका अध्यक्ष संदेश सावंत, स्वप्निल कोठावळे, तालुका सचिव मनोज कांबळी, सह सचिव स्वप्निल जाधव, शहराध्यक्ष आकाश परब, उपतालुकाध्यक्ष प्रणित तळकर, ज्ञानेश्वर नाईक, विभाग अध्यक्ष पंकज पेडणेकर, भास्कर सावंत, उपविभाग अध्यक्ष ओंकार मेस्त्री, रमेश शेळके यांचासह ओंकार गावडे प्रसाद आरोलकर, रोहित मुळीक, प्रज्वल परब यांच्यासहीत २५ पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्ष निरीक्षकांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यांनंतरही विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याची फळी पक्षाला राम-राम करीत असल्याने मनसेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून मनसेचे युवा व आक्रमक कार्यकर्ते येत्या काळात जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप घडवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दिलेले राजीनामे हे सर्वस्वी मुंबईतील नेमलेले सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक जबाबदार असल्याचे राजीनामा दिलेल्या मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.