
देवगड : देवगड येथील युवर फिटनेस क्लब, संस्थेच्या वतीने येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मंगळागौरीचा, उत्सव आनंदाचा’ या कार्यक्रमांतर्गत ‘खेळ पैठणीचा’ या स्पर्धेत जान्हवी लक्ष्मीकांत नाथगोसावी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. संस्थेच्या शरयू शरद ठुकरुल यांच्या हस्ते जान्हवी नाथगोसावी यांना आकर्षक पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान,तत्पूर्वी महिला कलाकारांनी सादर केलेल्या ‘मंगळागौरी’ नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सुमारे ३०० हून अधिक महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम तब्बल पाच तास रंगला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या साधना निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेच्या महिला कलाकारांनी मंगळागौरीचा जागर सादर करताना केलेल्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी विशेष दाद दिली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या स्पर्धेत द्वितीय क्रमांक वैशाली हडकर यांनी मिळविला. त्यांना विद्या माणगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तृतीय क्रमांक प्रिया पाटील यांनी मिळविला. त्यांना साक्षी नलावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.ललिता पेडणेकर या ‘उत्कृष्ट उखाणा’च्या मानकरी ठरल्या. त्यांना शरयू परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुमारे ६० महिला स्पर्धकांच्या सहभागातून ही स्पर्धा सहा फेऱ्यांमध्ये खेळविण्यात आली.
यावेळी साक्षी नलावडे, भक्ती करगुंटकर, पूनम हलाले, कृपा भद्रा, आशा घोगरे, विद्या माणगावकर, मनीषा जोशी, वंदना कुंभरे, अनुष्का धुरी, अनुश्री पारकर, रेश्मा बांदिवडेकर, रेखा सनगाळे, श्रावणी हिंदळेकर, सौ. शरयू परब, सौ. वर्षा खरात आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन कलाकार ऋत्विक धुरी यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या माणगावकर यांनी केले.