
खेड : सुमारे साडेअकरा कोटी रुपये खर्च करून नव्याने दुरुस्त करण्यात आलेले मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र 27 जुलैपासून नागरिकांच्या सेवेसाठी रुजू होत आहे. या सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच पालकमंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भारत गोगावले, नगर विकास व परिवहन मंत्री माधुरी मिसाळ, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, जिल्हा अधिकारी एम देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपस्थित राहणार आहेत. मीनाताई ठाकरे नाट्यगृह 2007 पासून नादुरुस्त झाल्याने बंद अवस्थेत होते त्यासाठी अनेक वेळा शासनाचा निधी खर्च करून दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला परंतु, हे नाट्यगृह दुरुस्त झाले नाही.
मध्यंतरी कोरोनानंतरच्या काळामध्ये दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी या नाट्यगृहाकडे जातीने लक्ष घालून राज्य शासनाकडून विशेष निधी प्राप्त करून घेतला, त्यानंतर ते स्वत: राज्यमंत्री झाल्याने या कामाला गती मिळाली. आणि नाट्यगृह दुरुस्त करून घेतले. त्यांच्या पुढाकाराने हे नाट्यगृहात लोकांच्या सेवेत रुजू होत आहे. 27 जुलै हा माजी मंत्री रामदास कदम यांचा वाढदिवस असल्याने या दिवशी हे नाट्यगृह जनतेसाठी खुले करण्यात येत आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण होणार आहे. नाट्यगृहाच्या लोकार्पणामुळे खेडच्या सांस्कृतिक केंद्रात नवी भर पडणार आहे. तसेच खेड नगर शहरासाठी हे नाट्यगृह वैभव ठरेल असे हे देखणे नाट्यगृह आहे. नाट्यगृह संपूर्णपणे वातानुकूलित आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. याचे संपूर्ण श्रेय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना द्यावे लागेल.