खेडमधून लवकरच कंटेनर वाहतुकीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले

मुंबईतील बीकेसीमध्ये विविध विभाग आणि उद्योजकांचा पार पडला व्यापारी मेळावा
Edited by: ब्युरो
Published on: January 30, 2024 08:10 AM
views 113  views

मुंबई : कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड येथून लवकरात लवकर  कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर खेड येथील उद्योजक, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, काँनकॉर, कस्टम विभाग आणि महाप्रित यांचा एक व्यापारी मेळावा त्या अनुषंगाने मंगळवारी मुंबईत बीकेसी येथे पार पडला.

      खेड मधून होऊ घातलेल्या कंटेनर वाहतुकीबाबत या मेलव्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.खेड रेल्वे स्थानकातून सुरू होणाऱ्या कंटेनर वाहतुकीसाठी वेगाने पाऊले उचलली जात आहेत. या करिताच या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांना एकत्र आणत आयोजित मेळाव्यात उद्योजक व व्यावसायिक  यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आला. यावेळी काँनकॉरचे चेअरमन संजय स्वरूप यांनी काँनकॉरने रत्नागिरी आणि खेड मध्ये व्यापार वृद्धी साठी केलेले प्रयत्न आणि खेड मधून होऊ घातलेल्या कंटेनर वाहतुकीचे फायदे सांगितले. कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार झा यांनी व्यापार वृद्धीसाठी खेड आणि रत्नागिरी येथे उभारल्या जात असलेल्या गोदाम, शीतगृह या विविध सुविधांबरोबर कोकण रेल्वेच्या मार्गावर उभारल्या जात असलेल्या पायाभूत सुविधा बाबत माहिती दिली. काँनकॉर च्या कमल जैन यांनी खेड मध्ये उद्योजकांना काँनकॉर कडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. जेएनपीटी सीमाशुल्क उपायुक्त रामदास काळे यांनी व्यापाराशी संबंधित सीमाशुल्क विभागाचे नियम आणि बदलत्या काळातील व्यापार यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या व्यापारी मेळाव्यात खेड चिपळूण येथून आलेल्या उद्योजकांनी उपस्थित केलेल्या शंकाच निरसन कोकण रेल्वे, काँनकॉर आणि सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

मुंबईत या व्यापारी मेळाव्यात विविध विभाग आणि उद्योजक एकत्र आल्याने कोकण रेल्वे मार्गावर व्यापार वृद्धीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नात महत्त्वाचे पाऊल पडल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलंय. तर खेड मधून फेब्रुवारीच्या मध्यापासून कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीनेही या मेळाव्यात सकारात्मक चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय.