खारेपाटण - भुईबावडा अनियमित बस फेरीमुळे विद्यार्थ्यांचे हाल

वारंवार निवेदने देऊनही एसटी प्रशासनाचं दुर्लक्ष
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 14, 2023 19:12 PM
views 210  views

कणकवली : खारेपाटण येथून दुपारी साडेबारा वाजता सुटणाऱ्या खारेपाटन भुईबावडा या बसच्या अनियमितपणामुळे खारेपाटण येथे शिक्षणासाठी येणार्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी ही बस वेळेत यावी यासाठी एसटी प्रशासनाकडे मागणी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास विद्यार्थी व शालेय संस्था यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की खारेपाटण विद्यालयामध्ये आजूबाजूच्या दशक्रोशीतुन  सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात यामध्ये भुईबावडा परिसरातील विद्यार्थी सकाळी सहा वाजता का भुईबावडा खारेपाटण गाडीने खारेपाटण येथे येतात शाळेची वेळ दुपारी 12 पर्यंत असल्याने त्यानंतर साडेबारा वाजता असणाऱ्या खारेपाटन भुईबावडा या गाडीने परत जात असतात. परंतु गेले कित्येक महिने खारेपाटन भुईबावडा या गाडीच्या अनियमित सेवेमुळे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना या एसटी प्रशासनाच्या कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे दुपारी साडेबारा वाजता ची वेळ असलेली खारेपाटन- भुईबावडा ही बस प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कारणाने उशिराने सुटत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी एसटीच्या खारेपाटन चौकशी व नियंत्रण कक्षामध्ये चौकशी केली असता त्यांना विविध कारणे दिली जातात यामध्ये वाहक नाही, चालक नाही, गाडीमध्ये बिघाड आहे अशा प्रकारची कारणे देऊन या विद्यार्थ्यांना बसची वाट पाहायला लावली जाते. 12:30 वाजता सुटणारी ही बस कित्येक वेळा दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान सुद्धा सोडली जाते यामुळे सदर विद्यार्थी सकाळी चार वाजता उठून सहा वाजता घर सोडून दुपारपर्यंत शाळेत राहून भुकेल्या अवस्थेत बस स्थानकामध्ये या बसची वाट पाहत थांबतात त्यावेळी ही बस उशिरा असल्याचे समजल्याने बेहाल होतात. याबाबत या विद्यार्थ्यांकडून शाळा संस्थेच्या संचालक मंडळाकडे तक्रार केली गेली असता या खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने एसटी प्रशासनाला सदर गैरसोई बाबत निवेदन देऊन कल्पना देण्यात आली होती त्याचप्रमाणे आमदार श्री नितेश राणे यांनीही याबाबत एसटी प्रशासनाकडे चौकशी केली होती. परंतु या सर्व बाबींकडे एसटी प्रशासनाच्या वतीने निव्वळ दुर्लक्ष केले जात आहे त्यामूळे या सर्व बाबींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर व त्यांच्या अभ्यासक्रमावर होत आहे. 

बुधवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सुद्धा या विद्यार्थ्यांकडून शाळेचे संचालक श्री महेश कोळसुलकर यांच्याकडे फोन द्वारे या बसच्या वेळेबाबत तक्रार आली असता खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री भाऊ राणे, सचिव श्री महेश कोळसुलकर व संचालक श्री योगेश गोडवे यांनी खारेपाटण  नियंत्रण कक्ष या ठिकाणी भेट देऊन याबाबत विद्यार्थ्यांची चौकशी केली असता विद्यार्थ्यांनी या बसच्या अनियमित सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत खारेपाटन बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक श्री चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही आपण याबाबतीत प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फोन द्वारे वारंवार माहिती दिली आहे असे सांगितले परंतु अद्याप पर्यंत याबाबतीत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यामुळे संतप्त विद्यार्थी व संस्थेचे संचालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत यापुढे अशा स्वरूपाची बस सेवा राहिल्यास सर्व विद्यार्थी व संचालक शिक्षक यांच्या वतीने खारेपाटण बस स्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित तोडगा काढून खारेपाटण भुईबावडा तसेच प्रिन्दावन, वाल्ये या ठिकाणी जाणाऱ्या बसचे योग्य नियोजन करून रोजच्या रोज योग्य वेळेत या बस सोडण्यात याव्यात अशी मागणी खारेपाटन शिक्षण संस्थेच्या संचालकांच्या वतीने करण्यात आली.