
वेंगुर्ले : बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे मागील कित्येक वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाविद्यालयास पूर्ण वेळ प्राचार्य मिळाले आहेत. प्रोफेसर डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी आज दिनांक १० जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२५ २६ पासून महाविद्यालयाचे पूर्ण वेळ प्राचार्य म्हणून प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला आहे.
प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांना शैक्षणिक क्षेत्रातील एकूण ३१ वर्षाचा अनुभव असून बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी महाराज जे. पी. वाळवी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, धडगाव, जिल्हा नंदुरबार येथे दोन वर्षे प्राचार्य म्हणून तसेच मुक्तानंद कॉलेज ऑफ सायन्स, येवला, जिल्हा नाशिक येथे मागील पाच वर्षांपासून प्राचार्य पदाचा कार्यभार यशस्वीपणे पार पाडलेला आहे. प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी हे प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक असून आज पर्यंत त्यांचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि मॅगझिन्स मध्ये रिसर्च पेपर्स प्रसिद्ध झालेले आहेत. यापूर्वी त्यांनी प्राणीशास्त्र विभागाच्या बोर्ड ऑफ स्टडीज चे सदस्य म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संदीप विद्यापीठ, नाशिक येथे देखील बोर्ड ऑफ स्टडीज चे सदस्य म्हणून प्रत्येकी पाच वर्ष कामकाज पाहिलेले आहे.
प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांचे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी स्वागतास उत्तर देताना आनंद व्यक्त केला आणि सर्वांनी मिळून महाविद्यालय आणि वेंगुर्ल्याची शैक्षणिक क्षेत्रात भरभराट करण्यासाठी एकजुटीने काम करण्यासाठी आवाहन केले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांचे महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य म्हणून स्वागत करीत असतानाच नुकतेच ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झालेले माजी प्रभारी प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले यांचा देखील निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
माजी प्रभारी प्राचार्य आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. बी. चौगुले यांना सदिच्छा देण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच अर्थशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजप उपजिल्हाध्यक्ष बाळू उर्फ प्रसन्न देसाई उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. ए. पी. बांदेकर, राज्यशास्त्र विभागाचे डब्ल्यू. ए. गावडे, समाजशास्त्र विभागाचे डी. आर. आरोळकर तसेच कुडाळ महाविद्यालयाचे डॉ. लोखंडे आणि स. का. पाटील महाविद्यालय, मालवणचे हरखुळे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संस्थेचे सेक्रेटरी मा. प्रा. जयकुमार देसाई, संस्थेच्या अध्यक्ष प्रा. सौ. मंजिरी देसाई मोरे आणि पॅटर्न कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. मान्यवरांचा परिचय डॉ. बी. जी. गायकवाड आणि डॉ. व्ही. एम. पाटोळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक, प्रा. डी. जे. शितोळे यांनी व्यक्त केले.