
दोडामार्ग : तिलारी धरणाच्या जलाशयालगत जुने शिरंगे हद्दीत सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या गौण खाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात, या मागणीसाठी सुरू असलेले खानयाळे ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाच्या पाचव्या दिवशी अखेर सोमवारी सकाळी आमदार दीपक केसरकर व उपोषण कर्ते यांच्यात चर्चा झाली. मात्र अपेक्षित निर्णय न मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी तेथील उपोषण सुरूच ठेवले आहे. तर प्रशासनाकडून तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव व प्र. तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी उपोषण स्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उलट प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने आता थेट काळ्या दगडाच्या खाणीच्या ठिकाणी उपोषणाचा ईशारा दिला आहे.
तिलारी धरणालगत शिरंगे हद्दीत काळ्या दगडाचे सुरू असलेले उत्खनन कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी खानयाळे ग्रामस्थांनी येथील शीव परिसरात गुरुवारपासून साखळी उपोषणा सुरुवात केली. मात्र उपोषणकर्त्यांची मागणी पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने उपोषण चालू ठेवण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. हत्ती पकड मोहिमेसाठी चाललेल्या उपोषणाला आमदार दीपक केसरकर यांनी भेट दिली. मात्र खानयाळे ग्रामस्थांच्या उपोषणाला आमदार केसरकर यांनी भेट न दिल्याने उपोषण कर्ते कमालीचे नाराज झाले होते.
आमदार केसरकर यांनी उपोषणकर्त्यांना मोबाईल द्वारे संपर्क करून आपले फ्लाईट असल्याने दोडामार्ग येथे सोमवारी सकाळी शहरात उपोषणकर्त्यांच्या काही प्रतिनिधींशी भेट घेण्याचे आश्वासन दिले. त्या अनुषंगाने उपोषणकर्त्यांचे काही प्रतिनिधींनी आमदार केसरकर यांची भेट घेतली. आ. केसरकर यांनी मागण्या ऐकून घेत खाणींच्या चौकशी संदर्भात एक कमिटी नेमण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. तसेच या कमिटीमार्फत मोजमापे घेतली जातील असेही सांगितले. मात्र उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा घेणार नसल्याचे सांगत पाचव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवले. सायंकाळच्या सत्रात प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने, तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र उपोषणकर्त्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यात त्यांना यश आले नाही. अधिकाऱ्यांनी दिलेला शासननिर्णय आणि घेतलेली दुटप्पी भूमिका या बाबत आणि लोकप्रतिनिधी यांनी पाठ फिरविल्याने आंदोलकात असंतोष आहे.