
कोकणसाद : रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा येथील प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिक ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे. याबाबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था विभाग रत्नागिरी यांच्यामार्फत रत्नागिरी उपविभागीय अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले. न्यायालयीन लढाई व वेळ पडल्यास रस्त्यावरची लढाई लढण्याची भूमिका या वेळी ग्रामस्थांनी आणि जिजाऊ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. मिऱ्या पाठोपाठ वाटद खंडाळ येथील स्थानिक ग्रामस्थांनीही प्रस्तावित एमआयडीसीला कडक विरोध दर्शवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी याचा काय निकाल लागतो याकडे लक्ष लागून राहिले आहे. निवेदन देण्याकरिता संस्थेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रथमेश गावणकर , संस्थेचे सचिव केदार चव्हाण, ॲड. महेंद्र मांडवकर व वाटद, मिरवणे, कोळीसरे, कळझोंडी, गडनरळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्याच्या उद्योग विभागाने 14 सप्टेंबर 2024 ला वाटद परिसरातील प्रस्तापित 5 गावांना उद्योग क्षेत्र म्हणून जाहीर केले. त्या अनुषंगाने लगेचच 15 दिवसात संबंधित शेतकऱ्यांना 32 /2 खाली जागा संपादित करण्यासाठी नोटीस काढण्यात आल्या. या नोटीस हातात मिळताच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांच्या मनात प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रश्न ग्रामस्थांमधून प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून विचारण्यात येत आहेत.
कोणत्याही प्रकल्पासाठी जागा संपादित करायची असेल तर नियम 1961/ 1 अन्वये अधिसूचना काढण्या पूर्वी संबंधित शेतकऱ्यांना लेखी सूचना दिली पाहिजे. परंतु तशी कोणतीही सूचना न देता केवळ या प्रक्रियेत आर्थिक लागे- बांधे जपण्यासाठी या जमिनी मोठ्या प्रमाणात दलालांच्या माध्यमातून पर-प्रंतियांच्या घशात घालून स्थानिकांना देशोधडीला लावण्याचे काम प्रशासन करीत आहे का ? अशी देखील चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. याबाबत खुलासा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
या जमिनीवर नक्की कोणता प्रकल्प येणार किंवा त्याचे स्वरूप कसे असणार आहे, याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला नाही किंवा तशी माहिती संबंधित यंत्रणा द्यायला तयार नाही. विकासाच्या नावावर जवळच उद्योगप्रकल्प चालू करण्यात आले. मात्र आजही यामध्ये स्थानिकांची रोजगाराच्यादृष्टीने फरफटच आहे. उलट मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. येत्या काळात स्थानिकांना स्थलांतरित व्हावे लागेल, अशी भीती ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
वाटद, खंडाळा या परिसरात आंबा, काजू बागायती मोठ्या प्रमाणात आहे. या माध्यमातून स्थानिक शेतकरी सधन आहे. एमआयडीसीमुळे शेतकरी देशोधडीला लागू शकतो शकतो. प्रशासन या शेतकऱ्यांचे पुनर्वसन कशा पद्धतीने करणार आहे, याचे उत्तर मिळाले पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
नवीन प्रकल्प येण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही, मात्र दलालांना पाठिशी घालून इथल्या जैवविविधतेला, स्थानिक शेतीला आणि जीविताला हानी पोहचवून स्थानिक ग्रामस्थांवर प्रशासन हा प्रकल्प लादत असेल तर प्रकल्पाविरोधात न्यायालयीन लढाई व वेळ पडल्यास रस्त्यावरची लढाई लढण्याची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.