
सावंतवाडी : सावंतवाडी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या डेगवे येथील शासकीय वनसर्व्हे क्रमांक 84, 85 मध्ये रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैरझाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. काल रात्री 12 वा. डेगवे ग्रामस्थांचा मदतीने वन विभागाने त्यांना रंगेहात पकडले.
डेगवे तांबोळी रत्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैर झाडाची कटरच्या सहाय्याने तोड करून त्याची वाहतूक करण्याचा तयारीत असल्याचा सुगावा डेगवे येथे राहणाऱ्या शंकर देसाई या तरुणाला लागला. त्यांनी तात्काळ इतर गावकरी मंडळी व वन विभाग यांना याबाबत माहिती दिली. यानंतर सावंतवाडी वन परिक्षेत्राची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. उपस्थित ग्रामस्थ व वनअधिकारी यांनी सापळा रचून शासकीय वनात तोड करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. महेश मोहन मालवणकर (वय-29 वर्षे, रा.तळवडे- म्हाळाईवाडी, ता.सावंतवाडी) तसेच दौलत अशोक गोडकर (वय-20 वर्षे, रा.तळवडे, ता.सावंतवाडी) या आरोपींसह सोबत आणलेल्या कटर मशीन, बॅटरी, तोड केलेल्या खैर झाडाचा माल, दोनचाकी गाडी (MH-07-AN-3337) देखील ताब्यात घेण्यात आली.
या आरोपींना अटक करण्यात आलेली असून आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डेगवे ग्रामस्थांनी गावचे शासकीय जंगल संरक्षित करून टिकवून ठेवण्यामध्ये, वन विभागाला वेळोवेळी सहकार्य करून, मोलचा वाटा उचललेला. दरवेळी प्रमाणे या कारवाईमध्ये देखील जंगल संरक्षणासाठी डेगवे ग्रामस्थांनी दाखवलेल्या सजगतेबद्दल तसेच गावातील जंगलात चोरतोड कारणाऱ्या आरोपींना पकडून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलल्याबद्दल सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांनी उपस्थित डेगवे ग्रामस्थ, पदाधिकारी यांचे आभार मानले. तसेच वन विभागाला सहकार्य करणाऱ्या शंकर देसाई या तरुणाचा वन विभागाकडून बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डेगवे गावचे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच मधुकर देसाई, पोलिस पाटील अरविंद देसाई, ग्रा.सदस्य राजेश देसाई, शंकर देसाई व इतर ग्रामस्थ मंडळी घटनास्थळी उपस्थित होते. यासोबतच या कारवाईमध्ये पर्यावरणप्रेमी असलेली युनियन बँक-शिरोडा शाखेचे बँक व्यवस्थापक अजिंक्य घोडके यांनी देखील वन विभागाला मोलाचे सहकार्य केले. ही कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल-प्रमोद सावंत, पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक-संतोष मोरे, दत्तात्रय शिंदे, अप्पासो राठोड, सागर भोजने, संग्राम पाटील व डेगवे ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी पार पाडली.