
सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्ग विरोधी वातावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली ते बांदा या बारा गावांमध्ये तयार होऊ लागल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी आंबोलीवरून शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग झाराप झिरो पाॅईंट किंवा मळगावपर्यंत वळवून आणला जाईल आणि तेथून रेडी बंदरापर्यंत आणि तिलारी पर्यंत रस्ते नेले जातील वगैरे पोकळ आश्वासने दिली आहेत असा टोला डॉ. जयेंद्र परुळेकर लगावला.
आजही शासन दरबारी शक्तीपीठ महामार्ग हा आंबोली गेळे येथून पारपोली नेनेवाडी घारपी फुकेरी असनिये तांबोळी डेगवे बांदा असाच जात असल्याचे दिसून येत आहे. बारा जिल्ह्यातून जाणारा ह्या महामार्गाची प्रस्तावित किंमत जी सुरवातीला ८६ हजार कोटी रुपये होती ती आता १ लाख १० हजार कोटी रुपये झाल्याचे समजते.(८०६ किमी साठी) एकीकडे, शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे, छोट्या मोठ्या कंत्राटदारांची जवळपास ९० हजार कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत. असे असताना एवढा मोठा अवाढव्य खर्च करून हा महामार्ग कोणासाठी बांधला जात आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर हजारो हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून बळजबरीने संपादित करून लाखो वृक्षांची कत्तल करून बांधण्यात येत असलेल्या सदर महामार्गाचा EIA (पर्यावरणीय आघात अहवाल) शासनाने अभ्यासला आहे काय? EC (पर्यावरणीय परवानगी) शिवाय हा महामार्ग बांधणे शक्य आहे का? असा सवाल डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.