नितेश राणेंनी अजूनही युतीचा विचार करावा !

आमच्या उमेदवारांला पाठिंबा द्या, १० जागांवरून माघार घेतो !
Edited by: विनायक गांवस
Published on: November 19, 2025 16:52 PM
views 102  views

सावंतवाडीत २१-० झाल्यास आश्चर्य नको : दीपक केसरकर


सावंतवाडी : पालकमंत्री नितेश राणेंकडे भाजपसोबत युती करण्यासाठी मी अनेक वेळा गेलो होतो. भाजप शिवसेनेची युती व्हावी ही माझी इच्छा होती. त्यामुळे युती कोणामुळे झाली नाही हे भाजपने पहावं. युवराज्ञींना आमच्याकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही ठेवला होता. अजूनही युती होऊ शकते. त्यांनी आपले १० उमेदवार मागे घ्यावे, आम्ही आमचे १० उमेदवार मागे घेतो. आमचा नगराध्यक्षांना भाजपने पाठिंबा द्यावा असे प्रतिआवाहन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी नितेश राणेंना दिलं. 


ते म्हणाले, सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत अजूनही युती होऊ शकते. त्यांनी आपले दहा उमेदवार मागे घ्यावे, आम्ही आमचे दहा उमेदवार मागे घेतो. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा सुशिक्षित आहे. तो सर्वसामान्य भेटू शकतो. तो मराठी चांगलं बोलू शकतो. त्यामुळे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव यावेळी दीपक केसरकर यांनी ठेवला. राजघराण्यावर कोणीही टीका केलेली नाही. नितेश राणे यांना कोणीतरी चुकीची माहिती पुरविली आहे. त्यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत नाही असा एकदाच उल्लेख फक्त संजू परब यांनी केला होता.


दरम्यान, कणकवली ते शहर विकास आघाडीला आम्ही अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. ती शहर विकास आघाडी आहे. पक्षाने अधिकृत भूमिका घेतलेली नाही आणि पक्षाने अधिकृत पॅनल उभ केलेले नाही. तुम्ही युती करत नाही आणि एकही जागा सोडत नाही, त्यामुळे याला जबाबदार कोण ? याचा विचार नितेश राणे यांनी करावा. नारायण राणे यांनी उपस्थित केलेल्या युतीच्या प्रस्तावाला माझा पाठिंबा होता, या संदर्भात मी रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भेटलो होतो. अजूनही वेळ गेली नाही पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना युतीने सामोरे जाऊया असं मत व्यक्त केले. यापूर्वी सावंतवाडी नगरपालिकेत १७ शून्य हा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करून २१ शून्य असं यश मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर कणकवली आणि मालवणची जबाबदारी निलेश राणे यांच्याजवळ आहे. त्यामुळे कणकवलीतील स्नेह भोजनाचा विषय निलेश राणे यांच्याशी संबंधित आहे अस श्री.केसरकर म्हणाले. यावेळी शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.