केसरकर तेलींच्या हाती कमळ लागू देणार नाही

प्रविण भोसलेंचा पलटवार
Edited by: विनायक गावस
Published on: October 29, 2023 17:38 PM
views 112  views

सावंतवाडी : भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी काहीच केलं नाही असं विधान केलं होतं.‌ त्यांची री ओढण्याच काम भाजपचे तळागाळातले कार्यकर्ते करत असल्याचा पलटवार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी लगावला. भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, शरद पवार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात जे झालं त्यावर भाजप जगत आहे. मागच्या दहा वर्षांत भाजपनं एकतरी केललं असं काम दाखवाव अस आव्हान त्यांनी दिल. 

ते म्हणाले, कोकणच्या विकासात शरद पवार यांचा देखील मोठा वाटा आहे. ते मुख्यमंत्री असताना मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन योजना, मच्छिमारांच्या हिताचे निर्णय, सरकारी कार्यालय, हॉस्पिटल, जिल्ह्याची राजधानी ओरोसची पायाभरणी शरद पवारांच्या काळात झाली. कोकण रेल्वेच श्रेय प्रा.मधु दंडवतेंच आहेच मात्र, शरद पवार यांनी देखील त्यासाठी भरीव निधी दिला. परंतु, आघाडीच्या काळात मंजूर झालेली काम भाजपला पूर्ण करता आली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शरद पवार यांच नाव घेऊन खोटं बोलण्याच काम त्यांनी चालवल आहे. मोदींची री ओढण्याच काम खालचे लोक करत आहेत.

अर्चना घारेंच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात होणारे मेळावे हे भाजपच्या पोटात दुखण्याच मुख्य कारण आहे असं प्रवीण भोसले म्हणाले. तर इंडिया आघाडीच सरकार येणार असं दिसू लागल्याने दीपक केसरकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजन तेली हे कावरेबावरे झाले आहेत. तेलींनी आता अपक्ष निवडणूक लढवू नये व दीपक केसरकर हे त्यांच्या हाती कमळ लागू देणार नाही हेही ध्यानात ठेवावं असा टोला देखील त्यांनी लागावला.

दरम्यान, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी म्हणाले, शरद पवार यांनी काय केलं हे पहायच असेल तर जिल्ह्यातील विकास कामांच्या पाट्या राजन तेलींनी वाचाव्यात. अथवा विकास कामांवर बोलण्यासाठी आमने-सामने यावं असं आव्हान त्यांनी दिलं. तर अर्चना घारेंच काम व राष्ट्रवादीला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजप अस्वस्थ झाल्याची टीका त्यांनी केली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला अध्यक्षा अँड. सायली दुभाषी, युवती अध्यक्षा सावली पाटकर, मारीता फर्नांडिस, बावतीस फर्नांडिस आदी उपस्थित होते.