केसरकरांनी राजीनामा द्यावा : रूपेश राऊळ

Edited by: विनायक गांवस
Published on: July 08, 2024 13:07 PM
views 172  views

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली आहे. त्यामुळे आतातरी थापा मारणाऱ्या केसरकर यांनी नैतिकता असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असे आव्हान उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिले आहे.

केसरकर यांच्या थापेबाजीवर जनतेत नाराजी आहे. आता तर केसरकर यांच्या मित्र पक्ष भाजपचे राजन तेली यांनीच मंत्री पदावरून पायउतार व्हावे असे म्हटले आहे. त्यामुळे केसरकर यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे असे राऊळ यांनी सांगितले. दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचा फटका सावंतवाडी तालुक्याला बसतो. यामध्ये बांदा परिसर व बाजारपेठ व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसतो. मात्र, प्रशासन, शासन यंत्रणा याबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्यास कुचकामी ठरली आहे. यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान होते. तसेच सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात नुकसान होते. तेव्हा केसरकर यांनी हे करू,ते करू असे म्हटले. मात्र, केसरकर यांनी काहीच केले नाही. ते मुंबईमध्ये निवासी झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या अडीअडचणीला आमदार धाऊन जात नाहीत अशा तक्रारी आहेत

आतापर्यंत अनेक आश्वासने, घोषणा केसरकर यांनी केल्या. पण बेरोजगारांना वाऱ्यावर सोडले. शिक्षणमंत्री असतानाही डीएड, बीएड तरुणांना वाऱ्यावर सोडून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशेहून शाळा नादुरुस्त आहेत. विद्यार्थी पाणी गळत असलेल्या वर्गामध्ये बसत आहेत. शिक्षण मंत्री हे सिंधुदुर्गातील आहेत. फक्त घोषणा, खोट्या आशेवर लोकांना भूलभुलैया करत आहेत अशी टीका राऊळ यांनी केली. काल रविवारी ढगफुटी सारखा पाऊस झाला. तेव्हा आमदार वैभव नाईक रस्त्यावर उतरून लोकांच्या मदतीला धावून गेले तर केसरकर सावंतवाडीमध्ये असूनही बांदा पूरस्थिती, होडावडा, तळवडे, सावंतवाडी,दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांच्या साधी विचारपूस करायला गेले नाहीत‌. त्यामुळे केसरकर यांचे खायचे आणि दाखवायचे दात जनतेला कळत आहेत असे राऊळ यांनी सांगितले.