
सावंतवाडी : शांत, सुसंस्कृत सावंतवाडी आपणास कुणाच्या हाती द्यायची आहे ? विधानसभा निवडणुकीत ज्यांच्यावर नारायण राणेंकडून आरोप झाले तेच मागच्या दरवाजाने एन्ट्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सावंतवाडीकर जनतेने सावध राहावे, असे आवाहन राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. तसेच आर्थिक चाव्या आपल्या हाती आहेत अशी आवाहन पालकमंत्र्यांनी करू नयेत. युतीच्या शासनात निधी वाटपाचे सुत्र असून त्याप्रमाणेच ते वाटप करण आवश्यक आहे. आमदारांच्या शिफारसीतून निधी दिला जातो. चुकीची विधान करू नयेत असंही ते म्हणाले.
श्री. केसरकर यांनी प्रभाग ६ मधील बंडखोर उमेदवार अर्चित पोकळे हे आपल्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. तर भाजप शिवसेना युती झाल्यास श्रद्धाराजे भोसले यांना सेनेचा उमेदवार म्हणून स्वीकारण्याची मी तयारी दर्शवली होती. स्वतः या संदर्भात राजघराण्याशी चर्चाही केली होती. मुख्यमंत्री युतीसाठी तयार होते. मात्र, पालकमंत्र्याची आपल्या अधिकाराचा वापर केला पाहिजे होता. तो त्यांनी केला नाही. त्यामुळे युतीवरून त्यांनी आज केलेली वक्तव्य म्हणजे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासारखे आहेत असे ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील युतीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही युती व्हावी यासाठी मी सुरुवातीपासूनच आग्रही होतो. यासंदर्भात मी पालकमंत्र्यांना दोन वेळा भेटलो. नारायण राणे यांचीही भुमिका युतीची होती. रविंद्र चव्हाण देखील तयार होते. राजघराण्याची आदर असल्यामुळेच भाजप आणि शिवसेना युती झाल्यास त्यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून स्वीकारण्याची तयारी मी दर्शवली होती. राजघराण्याशीही यासंदर्भात चर्चा केली होती. परंतु, तसे घडले नाही. मला आजही राजघराण्याची नितांत आदर आहे, यापुढेही तो राहील. राजघराण्यासंदर्भात कधीही चुकीचे बोललो नाही आणि बोलणारही नाही. तसेच निवडणुकीमध्ये कुठल्याच उमेदवाराकडून किंवा पदाधिकाऱ्याकडून वैयक्तिक आरोप होणार नाही, याची दक्षता ही मी घेतली आहे. आताची निवडणूक ही विकास कामांवर आधारित आहे. आमचे मुद्दे हे विकासाला धरून राहणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत कविटकर या उच्चशिक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले आहेत. कठोर परिश्रमातून त्यांनी वकिली पदवी मिळवली आहे. त्या 24 तास जनतेसाठी उपलब्ध असतील असा मी शब्द देतो. ते शहराला स्वच्छ प्रशासन देतील. मुळात विधानसभेप्रमाणे या निवडणुकीतही मी प्रत्येकाच्या घरोघरी प्रचारासाठी जाण्याचे ठरवले होते. परंतु, प्रकृतीच्या कारणांमुळे डॉक्टरांनी अनुमती दिलेली नाही. माझे प्रसिद्धी पत्रक हाच माझा प्रचार समजून जनतेने मला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अर्चित पोकळे, परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते











