
सावंतवाडी: राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या मंत्रालय मुंबई येथील दालनामध्ये भेट घेतली. यावेळी मौजे आंबोली, चौकुळ, गेळे येथील कबुलायतदार गावकर जमिनिस खाजगी वन असा असलेला शेरा कमी करुन ती लाभधारक शेतकरी यांना वितरीत करण्यास उपलब्ध करून मिळणेबाबत मागणी केली.
महसुल विभागाकडून सादर केलेल्या वनखात्याकडील प्रस्तावास मान्यता मिळण्याबाबत वनमंत्री यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. यावेळी मंत्री श्री. नाईक यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तीच्या उपद्रवाबाबत उपाययोजना करण्यासाठी यापूर्वी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या हत्ती पकड मोहीम राबविणेसाठी परीपूर्ण अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यास दिलेल्या निर्देशानुसार हा प्रस्ताव प्रशासनामार्फत वनमंत्र्यांकडेसादर करण्यात आलेला असुन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार वन मंत्री यांनी पुढील आठवडयात बैठक आयोजित करुन सकारात्मक निर्णय घेवुन यावर कायमस्वरुपी उपाय योजना करण्याचे मान्य केले आहे.