केसरकरांनी राज्य सरकारच अपयश मान्य केले : रूपेश राऊळ

Edited by: विनायक गांवस
Published on: June 10, 2025 14:52 PM
views 120  views

सावंतवाडी : नगराध्यक्ष, चार वेळा आमदार आणि काही काळ मंत्रीपद भूषवलेल्या, प्रशासनाचा गाढा अभ्यास असलेले आमदार दीपक केसरकर आरोग्य, वीज वितरण आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सतत कोलांट्या मारत असल्याने त्यांच्या हतबलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल पत्रकार परिषदेत तर त्यांनी पत्रकारांनाच "तुम्ही डॉक्टर आणा" असे सांगून महायुती सरकारच अपयश अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले आहे असे ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केसरकरांवर आरोप करत जोरदार हल्ला चढवला आहे.

श्री. राऊळ म्हणाले, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सर्रास गोवा बाबुंळी येथे पाठवले जाते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, आमदार केसरकर हतबल झाले आणि त्यांनी पत्रकारांनाच डॉक्टर आणायला सांगितले. सत्तेत असूनही आणि मंत्रीपद भूषवलेल्या केसरकरांनी असे बोलणे धक्कादायक आहे आमदार केसरकर वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चिपळी वाजवत असतात. जर त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंमत देत नसतील तर त्यांनी तसे जाहीर करावे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराचा अपमान म्हणजे मतदारांचा अपमान आहे.

आमदार दीपक केसरकर यांचे आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हे कर्तव्य आहे. परंतु ते आपल्या कर्तव्यापासून दूर पळत असल्याचे त्यांची हतबलता दाखवून देत आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदार केसरकर यांनी आरोग्य, रोजगार, वीज लपंडाव, हत्ती पकड मोहीम, वन्य प्राण्यांचा हैदोस यांसारख्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन गोरगरीब जनतेला दिलासा कधी मिळणार हे स्पष्ट करावे. मतदारसंघात वारंवार थांबणार असे सांगूनही केसरकर केवळ येतात आणि जातात. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देऊ शकत नाहीत असा टोला रुपेश राऊळ यांनी हाणला आहे. आमदार केसरकर 'वरातीमागून घोडे नाचवत बसले आहेत' असा आरोप त्यांनी केला आहे. विनायक राऊत खासदार असताना त्यांनी यशस्वीपणे 'हत्ती पकड मोहीम' राबवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. सध्या केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी केसरकर यांचे सरकार असतानाही, हत्ती पकड मोहीम आणि वन्य प्राण्यांच्या हैदोसाचे प्रश्न का रखडले आहेत ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. केसरकर हे नेहमीच मोदी, शहा आणि फडणवीस यांचा जप करत असतात. मग हे प्रश्न का सुटत नाहीत ? असेही विचारण्यात आले आहे.याचबरोबर, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांची तीन वर्षांची मुदत पूर्ण होत असल्याने त्यांची बदली निश्चित आहे. याचा फायदा घेत केसरकर हे हत्ती पकड मोहिमेचा ठपका मुख्य वनसंरक्षक यांच्यावर ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्यापर्यंत केसरकर पोहोचू शकत असताना आणि प्रश्न मांडू शकत असताना, ते मुख्य वनसंरक्षक यांच्यावर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत आहेत असेही म्हटले आहे. कात व्यवसायिकांची आठ महिन्यानंतर आठवण आली. 'शेतकरी व कात व्यावसायिक दूधखुळे नाहीत' हे आमदार केसरकर यांनी लक्षात घ्यावे, असा सल्लाही त्यांना रूपेश राऊळ यांनी दिला आहे.

याव्यतिरिक्त, आरोग्य, रोजगार, वीज लपंडाव अशा विविध विषयांवर चर्चा करणार असल्याचे आमदार केसरकर अजून किती दिवस सांगत राहणार आहेत असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.