एकरकमी अनुदानासाठी केंद्रे प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरूच | एकाची तब्येत खालावली

मंगळवारी मंत्रालयात बैठक
Edited by: संदीप देसाई
Published on: November 21, 2022 20:30 PM
views 176  views

दोडामार्ग : तिलारी प्रकल्पात विशेष बाब म्हणून पुनर्वसन झालेल्या केंद्रे गावच्या प्रकल्पग्रस्तांनी एक रक्कमी अनुदान मिळावे यासाठी सुरू केलेले उपोषण चौथ्या दिवशी सुरूच असून एकाची प्रकृती खालावल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अधिकारी यांनी याप्रश्नी तोडगा निघावा म्हणून मंञालयात बैठकीचे निमंत्रण दिल्याची माहिती मिळाली आहे. 


तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या केंद्रे धरणग्रस्त यांना शासनाकडून नोकरी ऐवजी पाच लाख रुपये अनुदान मिळावे, यासाठी यासाठी गेल्या चार दिवसांपासून वीजघर केंद्रे पुनर्वसन चव्हाठा येथे प्रकल्पग्रस्त यांचे उपोषण सुरू आहे. यावर तोडगा निघाला नसल्याने उपोषण सुरू असताना सोमवारी दुपारी यातील लिंगो कृष्णा हरीजन याची तब्येत खालावली. त्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान,  जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून मंगळवारी दोन केंद्रे धरणग्रस्त प्रतिनिधी यांना मंञालयात बैठकीला निमंत्रित केले आहे. मात्र निर्णय होईपर्यंत माघार नाही, असा पवित्रा केंद्रे धरणग्रस्त यांनी घेतला आहे. संजय नाईक, प्रकाश गावडे, कृष्णा हरिजन, लवू गावडे, अमर जाधव, विजय कांबळे यांनी हे उपोषण छेडलं आहे.