केंद्रप्रमुख गुरुदास जनार्दन कुबल सेवापूर्ती सत्कार सोहळा विशेष

Edited by: लवू परब
Published on: December 31, 2024 21:09 PM
views 185  views

 ज्ञानदानाचे पवित्र कार्य इमाने इतबारे करत शिक्षक - विद्यार्थी यासह अनेकांना 'गुरू' स्थानी असणारे आणि  शिक्षण क्षेत्रात 'दास' बनून वाहून घेत जीवन समर्पित करणारे व्यक्तीमत्व म्हणेज गुरूदास कुबल गुरुजी. ते कोलझर केद्राचे केंद्रप्रमुख, तथा दोडामार्ग गट साधन केंद्राचे गटसमन्वयक. ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून ३१ डिसेंबर २०२४ ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा आज सपत्निक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याच निमित्ताने कर्तव्यदक्ष शिक्षक ते कुटुंबवसल्य भाऊ याबाबत प्रणिता साबाजी मोरजकर यांनी त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाशझोत...

शाळेत शिकले मी बरेच काही पण माझ्या भावाच्या अनुभवाच्या धड्यापेक्षा प्रेरणादायी असे काहीच नाही. मित्र, सखा, सोबती सर्व नाती तो बजावतो तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा आपला दुसरा बाप तो असतो !

भविष्यातील स्वप्ने अनेक असतात. त्याचा पाठपुरावा केल्यास यश दूर नाही. असाच स्वप्नांचा पाठपुरावा करताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. गुरुदास जनार्दन कुबल यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवले आहेत. त्यांचे कित्येक विद्यार्थी आज उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यापैकीच मी एक सौ. प्रणिता साबाजी मोरजकर आज आर.पी.डी. ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे पूर्णवेळ शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, ती केवळ आणि केवळ माझ्या या वडीलबंधूमुळे. मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मला बी.एड. कोर्स पूर्ण करण्यास प्रेरित केले. आमची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी मला व माझ्या इतर भांवडांना आर्थिक साहाय्य करून आत्मनिर्भर बनवले.

समाज घडवण्याचे ध्येयवेडे स्वप्न घेऊन ते १९८८ सालापासून शिक्षकी पेशात आले. मुळातच मनमिळावू, कामसू, आणि विद्यार्थिप्रेमी असल्याने त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेत सहभाग घडवून आणला. शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ, गटसमन्वयक आणि शिक्षक पतपेढीचे अध्यक्षपद भुषवणे इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. एका सामान्य कृषी कुटुंबात जन्मलेला मुलगा समाजभान ठेवून आपली शिक्षकी पेशातील कारकीर्द तेवढ्याच ताकदीने निभावतो याचा सर्वांबरोबर आम्हा कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे.

आयुष्यभर मेहनत करणारे आमचे वडील निवांतपणे विश्रांती घेतील हे अर्थात संभव नव्हते. विरंगुळा म्हणून सतत काहीतरी 'रिपेअर' करण्याच्या खटपटीत असत. त्या वेळीसुद्धा बाबांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याची गरज आहे हे ओळखून घरात दररोज दैनिक सुरू केले. टी.व्ही. आणला. म्हातारपणी बाबांना भाकरीचा तुकडा चावता यावा म्हणून दातांची कवळी बसवली. काकांना दम्याचा आजार असल्याने खूप त्रास होत होता. डॉक्टरांना सांगून घरातच औषधोपचार सुरू केले. अशा त-हेने स्वतःच्या करिअरबरोबर भावडांच्या करिअरसाठी तेवढ्याच जबाबदारीने काम केले. म्हणून आज वकील, शिक्षक, उद्योगधंदा या क्षेत्रांत आम्ही इतर भावंडे दिसत आहोत. प्रसंगावधान राखून आलेल्या प्रसंगावर मात करणे, त्याचबरोबर सहनशीलता हा सगळ्यांत मोठा गुण त्यांच्या अंगी आहे.

आपल्या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिवसरात्र झटून, पायी प्रवास करून, मांगेलीसारख्या खेडेगावात सात वर्षे नोकरी केली. चौथीपर्यंत शाळा होती; ती धडपड करून सातवीपर्यंत करून घेतली. म्हणूनच मांगेलीत शिक्षणाची गंगोत्री निर्माण झाली. विविध सामाजिक उपक्रम, शासकीय सुविधा समाजापर्यंत पोहोचवण्याची तळमळ किंवा शैक्षणिकदृष्टया मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाला करण्यात येणारे साहाय्य असो, ते नेहमीच आघाडीवर असायचे.


आपल्या वयातील ३६ वर्षे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. शिक्षणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा आदी क्षेत्रांतही ते कार्यरत असतात. जनजागृतीच्या विविध उपक्रमांत सातत्याने त्यांनी काम केले आहे. गोरगरिबांना शिक्षण देताना त्यांनी शुल्काबाबत कधीच आग्रह धरला नाही. आजपर्यंत गरजूंना केलेली मदत ह्या हाताची त्या हाताला कळू दिली नाही. याचे ज्वलंत उदाहरण माझ्या शैक्षणिक सेवेत मी पाहिले. दोडामार्ग ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी दरवर्षी एक-दोन गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च ते करीत असत. पण कधी स्वतःच्या नावाचा उल्लेख करू दिला नाही.

या त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या पत्नीची त्यांना सदैव साथ लाभली. तो जो कोणी आहे, या स्तरावर पोहोचला आहे, त्याचे बाळकडू त्याला आमच्या आई- बाबांकडूनच मिळाले आहे. आपल्याकडे जे आहे, त्यातला थोडा तरी हिस्सा दुसऱ्याला द्यावा, ही कृतज्ञतेची भावना मनात ठेऊनच त्यांनी आजपर्यंत प्रवास केला आहे. आई-बाबांची समाजाप्रति असलेली ओढ त्यांनी कायम मनात बाळगली. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास, आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने थांबतोय. पण, मला वाटते, सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हा प्रवास अविरत सुरूच राहील. आज माझे वडील हयात नसले तरी त्यांची आशीर्वादरूपी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडत राहील.

आपल्या मुलाने कौटुंबिक जबाबदारीसोबत सामाजिक कार्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली या जाणिवेने त्यांची मान नक्कीच उंचावत असेल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन १९८८ मध्ये रुजू झाल्यापासून ते आज सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी अणि उज्ज्वल निकालासाठी निरंतर धडपड सुरू ठेवली आहे. शिस्त आणि दर्जा ही त्यांच्या अध्यापनाची तत्त्वे आहेत. ती त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून पाळली आणि आज निवृत्तीकडे येतानाही ती तशीच ताजी टवटवीत ठेवली आहेत. जमिनीवर पाय ठेवून त्यांनी केलेली ३६ वर्षांची अध्यापकीय वाटचाल समस्त शिक्षकवृंदांसाठी आदर्शवत आहे. अशा हसतमुख, मनमिळावू आणि विद्वत्ता जोपासून वाटचाल करणाऱ्या आमच्या वडीलबंधूला मोरजकर आणि कुबल कुटुंबाकडून मानाचा मुजरा !