
सिंधुदुर्गनगरी : नेहमीच्या कामकाजाशिवाय नव्या संकल्पना राबवत अधिकाऱ्यांनी कामकाज करावे. जिल्ह्यात रोजगार निर्मिती केल्यास तरुणांचे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल. जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरु करुन जेनरिक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा. बालकांच्या कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आहारतज्ज्ञ यांनी एकत्रितपणे नियोजन तयार करावे. पर्यटनवाढीसाठी वेगळे प्रयोग करुन जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात अग्रेसर ठेवा, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
विविध विभागीय अधिकाऱ्यांची आज पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता विजय थोरात आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, नगरपरिषद-नगरपंचायतींची भविष्यातील हद्दवाढीचा विचार करुन मुख्याधिकाऱ्यांनी नियोजन करावे. अग्निशमन दलासाठी फोम बँक आणि टप्प्या-टप्प्याने केंद्र करा. कोणती आव्हाने आहेत, अडचणी काय येतात, याबाबतही चर्चा करावी.त्या सोडविण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करु. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख योजना, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता अभियानांतर्गत काम करा.
महानोंदणी मोबाईल अॕपवर शेतकऱ्यांची नोंदणी ताकदीने करा, अशी सूचना महसूल अधिकाऱ्यांना करुन पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, जिल्हा परिषदेनेही ग्रामपंचायतींमार्फत कचऱ्यावर प्रक्रिया केंद्र उभे करावे. त्याबाबतचा प्रस्ताव द्यावा.
कुपोषित बालकांच्या वजन वाढीसाठी त्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत विचार करावा. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, आहारतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांनी एकत्रितपणे अहवाल तयार करावा. पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरु करावे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक असणारे जेनरिक औषधांचा साठा ठेवा. त्याचा प्रचार प्रसार करा.
सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांनी नियमित कामकाजाशिवाय वेगळ्या संकल्पना राबवून जिल्ह्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्याचा एक पॕटर्न तयार करावा, असेही ते म्हणाले.