स्वप्ना गोवेकर यांच्या ‘काव्यरंग’ला 'कोमसाप'चा पुरस्कार प्रदान !

Edited by: ब्युरो
Published on: February 28, 2024 07:16 AM
views 128  views

सावंतवाडी : येथील युवा कवयित्री स्वप्ना विकास गोवेकर यांच्या ‘काव्यरंग’ला कोकण मराठी साहित्य परिषदेचा सुलोचना नार्वेकर स्मृती काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाड येथे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार गोवेकर यांना प्रदान करण्यात आला. 

सरलता हे या काव्यसंग्रहाचे विशेष असून, मानवी जीवनाचे विशेष पैलू उलगडताना विविध भावभावनांचे तरल चित्रण करणारा हा काव्यसंग्रह आहे. विविध जीवनमूल्येही या काव्यसंग्रहातून अधोरेखित होतात. भाषासौंदर्याने नटलेला आणि सर्वांना आपलेसे करणारा हा ‘काव्यरंग’ रसिक वाचकांच्या मनाला थेट भिडतो. याचीच दखल घेत कोकण मराठी साहित्य परिषदेने हा पुरस्कार युवा कवयित्री स्वप्ना गोवेकर यांना प्रदान केला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संपूर्ण कोकणपट्ट्यातील ६७ शाखांमधून सावंतवाडी येथील या कवयित्रीची  निवड करण्यात आली होती. 

कवयित्री स्वप्ना गोवेकर यांच्या साहित्य लेखनातील या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कौतुक होत आहे. पतंजली योग समिती, सिंधुदुर्ग, को.म.सा.प. शाखा सावंतवाडी, निवृत्त कर्मचारी संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, कळसुलकर माजी विद्यार्थी बॅच २००३, श्री पंचम खेमराज महाविद्यालय प्राध्यापक वर्ग तसेच अटल प्रतिष्ठान, सावंतवाडीतर्फे कवयित्रीला शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कवयित्री स्वप्ना गोवेकर यांनीही कोकणच्या मातीबद्दल ऋण व्यक्त केले.