कातळशिल्पांमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्याची क्षमता : सतीश लळीत

मुंबई येथील व्याख्यानात मांडली भुमिका
Edited by:
Published on: December 24, 2023 15:04 PM
views 61  views

सिंधुदुर्गनगरी : कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे जतन, संरक्षण करुन त्याठिकाणी किमान आवश्यक सुविधा देऊन त्यांची योग्य प्रसिद्धी केल्यास पर्यटनक्षेत्राला वेगळी दिशा मिळेल. यादृष्टीने संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हे 'डेस्टिनेशन' म्हणुन विकसित करताना कातळशिल्प ठिकाणांना प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक व शासनाच्या स्वदेश दर्शन डेस्टिनेशन मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य सतीश लळीत यांनी नुकतीच गोरेगाव (मुंबई) येथे दिली.

मुंबईतील प्रख्यात शिक्षणसंस्था असलेल्या चिकित्सक समुहाच्या गोरेगाव येथील पाटकर-वर्दे महाविद्यालयात आयोजित केलेल्या 'कोकणातील कातळशिल्पे' या सादरीकरणासह व्याख्यानात ते बोलत होते. चिकित्सक समुहाचे सहसचिव व विश्वस्त डॉ. गुरुनाथ पंडित यांनी पुष्पगुच्छ देऊन सतीश लळीत यांचे स्वागत केले. व्यासपीठावर प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर उपस्थित होत्या. श्रीमती सविता धावडे यांनी प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. व्याख्यानाला प्राध्यापक, निमंत्रित नागरिक, विद्यार्थी असा तिनशेहून अधिक श्रोतृवृंद उपस्थित होता.

लळीत यांनी आपल्या दीड तासाच्या व्याख्यानात कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या कातळशिल्पांबाबत सादरीकरण केले. यावेळी गेल्या दोन दशकांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांत सत्तरहून अधिक ठिकाणी पंधराशेहून अधिक कातळशिल्पे आढळली आहेत. अजुनही अज्ञात असलेली कातळशिल्पे उजेडात येत आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यात 'युनेस्को' या जागतिक संस्थेने कोकणातील आठ व गोव्यातील एक अशा नऊ ठिकाणांचा समावेश 'जागतिक वारसा स्थळां'च्या तात्पुरत्या यादीत केला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपीचा समावेश आहे. कुडोपी हे जिल्ह्यातील सर्वात मोठे कातळशिल्प ठिकाण असुन तेथील 'बाहुल्यांचे टेंब' या सड्यावर ८०हून अधिक कातळशिल्पे सापडली आहेत. खोटले येथील धनगरवाडी सड्यावरील कातळशिल्पे पहाण्यासारखी आहेत. अलिकडेच धामापुर मोगरणे सड्यावरील शेजारी डुक्कर असलेल्या व हातात शस्त्र घेतलेल्या शिकारी माणसाच्या आतापर्यंतच्या पहिल्या कातळशिल्पाचा शोध आपण लावल्याची माहितीही त्यांनी दिली.

केंद्र शासनाच्या 'स्वदेश दर्शन' या योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा 'डेस्टिनेशन' म्हणून जाहीर झाला आहे, असे सांगून श्री. लळीत म्हणाले की, जिल्ह्याचे पर्यटन सद्या केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित राहिले आहे. मात्र जिल्ह्यातील गडदुर्ग, मंदिरे, अत्यंत सुरेख अशी पर्यटनगावे, तलाव, खाड्या, बंदरे, लोककला, वेंगुर्ल्याच्या 'क्रॉफर्ड मार्केट'सारख्या टिपिकल कोकणी बाजारपेठा या बाबींकडे अजून पर्यटनविकासाच्यादृष्टीने पाहिले जात नाही. आता यात कातळशिल्पांची भर पडली आहे. अश्मयुगातील मानवाच्या पाऊलखुणा असलेली ही कातळशिल्पे आपला समृद्ध प्रागैतिहासिक वारसा आहे.  ही ठिकाणे विकसित केल्यास व त्याठिकाणी पर्यटकांना आवश्यक सुविधा दिल्यास ती देशी तसेच परदेशी पर्यटकांची आकर्षणकेंद्रे होऊ शकतात.

शासनाने नेमलेली डेस्टिनेशन मॅनेजमेंट कमिटी यादृष्टीने संपुर्ण जिल्हा हे 'डेस्टिनेशन' म्हणून आगामी काळात विकसित होण्याच्यादृष्टीने आराखडा बनवित आहे. कमिटीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या विषयाला प्राधान्य दिले असुन नुकत्याच झालेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत पर्यटन विकासाची आपली भुमिका स्पष्ट केली आहे. कातळशिल्प ठिकाणे हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थान होऊ शकते. मात्र जतन, संरक्षण, सुविधा आणि प्रसिद्धी याचा परिणामकारक वापर केल्यास पर्यटक मोठ्या संख्येने त्याकडे वळतील. यामुळे पर्यटनक्षेत्राच्या विकासाबरोबरच स्थानिक नागरिकांचा आर्थिक विकास होण्यास हातभार लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.