कसई - दोडामार्ग न.पं.च्या प्रारूप विकास आराखड्यात नेमकं दडलंय काय ?

बैठकीस पत्रकारांना सहभागी न केल्याने उपस्थित झाले अनेक सवाल
Edited by: संदीप देसाई
Published on: February 07, 2024 06:07 AM
views 87  views

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या नगररचना विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी सभेपासून पत्रकारांना नगरपंचायत ने निमंत्रित करून बाजूला ठेवल्याने ही गोपनीयता नेमकी कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि जर पत्रकारांना सभेत सहभागी करून घ्यायचेच नव्हते तर निमंत्रित तरी का करण्यात आले असा सवाल पत्रकारांतून उपस्थित करणेत आला आहे. सभा घेण्यासाठी आलेले नगररचना विभागाचे संचालक विद्याधर देसाई यांनीही पत्रकारांच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर न देता सभा संपताच तेथून काढता पाय घेतल्याने शहर विकासाच्या प्रारूप आराखड्यात नेमकं दडलंय तरी काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

         ग्रामपंचायतचे कसई-दोडामार्ग नगरपंचायतमध्ये वर्गीकरण झाले नंतर दोडामार्ग ला शहरीकरणाचे वारे वाहू लागले आहे. दोडामार्ग शहरात अलीकडच्या काळात अनेक मोठ-मोठ्या निवासी इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, छोटे-मोठे उद्योग धंदे, व्यापारी संकुले वगैरे वेगाने उभ्या राहत आहेत. साहजिकच त्यामुळे शहरातील लोकसंख्या देखील वाढीस लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य, पाणी, शिक्षण, दळणवळण, इमारत व्यवस्थापन,  स्वच्छता, निवारा, कचरा, सांडपाणी आदींचेही नियोजन करणे सुरू झाले आहे. नगरपंचायत तर्फे गेल्या काही वर्षांपासून या संदर्भात आपल्या परीने नियोजन केले जात आहे. मात्र आता या शहराला प्रारूप देण्यासाठी व शहर नियोजन बद्ध वासण्यासाठी जिल्हा प्रशासनातील नगर रचना विभाग देखील याठिकाणी कार्यरत झाला आहे. त्या अनुषंगाने कसाई दोडामार्ग नगरपंचायत शहरांचा म्हणजे नगरपंचायत चा प्रारूप विकास आराखडा बनविला गेला आहे. काही दिवसांपापूर्वी झालेल्या बैठकी नंतर पुन्हा मंगळवारी नगररचना विभाग (टाऊन प्लॅनिंग) व नगरपंचायत या दोहोंची त्याच प्रारूप विकास आराखड्याला चर्चा करून मंजुरी देणेसाठी संयुक्त बैठक येथील बाजारपेठेतील पिंपळेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वतः नगरपंचायत ने पत्रकारांना पत्रक काढून निमंत्रित केलं होत. मात्र बैठकीला गेल्यावर उपस्थित अधिकारी यांनी पत्रकार यांच्या सहभागाला आक्षेप घेतला.   नगर रचना विभागाचे सहा. संचालक विद्याधर देसाई यांच्या सुचनेनुसार हा आक्षेप घेतल्याचे मागवून नगराध्यक्ष यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र ज्या सभेला स्वतः नगराध्यक्ष यांनी पत्रकारांना निमंत्रित केले होते तिथे ती बाब नगराध्यक्ष यांनी उपस्थित अधिकारी यांचेकडे उघड करणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने पत्रकारांनी नगरपंचायत व नगराध्यक्ष यांच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.


त्या शहर विकास प्रारूप आराखड्यात नेमके दडलंय तरी काय ?

          दोडामार्ग शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला चर्चा करून मान्यता देण्याची जर ही सभा होती.तर शहर विकासाचे नियोजन पत्रकारांपासून एवढं लपविण्याची गरजच काय. त्या बाबत एवढी गुप्तता पाळण्याचे नेमके कारण तरी काय? नगररचना विभागाचे अधिकारी व नगरपंचायतचे पदाधिकारी यांच्यातच ही बैठक होती, तर मग पत्रकारांना निमंत्रणे का पाठविण्यात आली? असे सवाल उपस्थित होतो आहे. 



अधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय

        नगराध्यक्ष यांनी निमंत्रित करूनही पत्रकारांना सभेस सहभागी होण्यापासून रोखणाऱ्या अधिकारी यांचेशी उपस्थित पत्रकारांनी बैठक संपल्यावर बातचीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर समर्पक उत्तर न देता अधिकारी तेथून निघून गेल्याने पत्रकारांनी अधिकच नाराजी व्यक्त केली..