करुळ घाटात पाच ठिकाणी दरडींचा धोका कायम : तज्ञ टिमच्या सर्व्हेतून निष्कर्ष

त्या दरडी हटविण्याचे काम आजपासून होणार सुरु
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 06, 2025 12:19 PM
views 76  views

वैभववाडी : करुळ घाटात पाच ठिकाणी दरडींचा धोका असून त्या हटविणे गरजेचे आहे.असा अहवाल आज (ता ५) करूळ घाटरस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या तज्ञांच्या पथकाकडुन देण्यात आला आहे.दरम्यान उद्यापासून या दरडी हटविल्या जाणार आहेत.

करूळ घाटात गुरूवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली.मोठ मोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली.महामार्ग प्रधिकरणने दोन जेसीबी आणि एक ब्रेकरच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू केले होते.काल सायकांळी उशिरापर्यत दरड हटविण्याचे काम सुरू होते.त्यानतंर आज सकाळपासुन पुन्हा दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.परंतु दुपानतंर हे काम बंद करण्यात आले आहे.त्यामुळे रस्त्यावर दरडीचा बहुतांशी भाग पडुनच आहे.

दरम्यान ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी दरडींना भेगा गेल्या आहेत.त्यामुळे तेथे पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता आहे.याशिवाय घाटात अन्य ठिकाणी देखील दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काल करूळ घाट मार्ग १२ सप्टेंबरपर्यत वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेतला.तज्ञ पथकांकडुन पाहणी केल्यानतंर या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार होता.त्यानुसार आज रत्नागिरी येथील १५ ते २० जणांचा समावेश असलेले तज्ञांचे पथक करूळ घाटात दाखल झाले.या पथकाने दिवसभर करूळ घाटरस्त्याचे सर्वेक्षण केले.सर्वेक्षणाअंती पथकाने पाच ठिकाणे धोकादायक असल्याची निश्चित केली आहेत.या ठिकाणी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असलेल्या दरड पाडण्याचा सल्ला पथकांकडुन देण्यात आला आहे.उद्यापासून या धोकादायक दरडी पाडल्या जाणार आहेत.या पथकासोबत महामार्ग प्रधिकरणच्या कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनीही करुळ घाट रस्त्याची पाहणी केली.याबाबत श्रीमती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, करूळ घाटरस्त्यांचे तज्ञ पथकाने सर्वेक्षण केले .या सर्व्हेक्षणात पाच ठिकाणे धोकादायक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. याशिवाय सध्या कोसळलेल्या ठिकाणी देखील आणखी दरड कोसळण्याचा अंदाज त्यांच्याकडुन देण्यात आला आहे.त्यामुळे सायकांळी दरड हटविण्याचे काम थांबविण्यात आले.