
देवगड : शिरगाव हायस्कूलचा विद्यार्थी कार्तिक चौकेकर याची ISRO अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. शिरगाव येथे इयत्ता ९ वी अ मधील विद्यार्थी कार्तिक महेश चौकेकर यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. सन २०२२-२३ मध्ये जि. प सिंधुदुर्ग यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या “सिंधुदुर्ग जिल्हा प्रज्ञा शोध परीक्षेत” (STS EXAM) त्याने उल्लेखनीय कामगिरी करत देवगड तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. या परीक्षे मध्ये आलेल्या प्रत्येक तालुक्यातील पहिल्या तीन विद्यार्थ्यांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली असून, कार्तिक या प्रतिष्ठित दौऱ्यात सहभागी होणार आहे.
कार्तिक १८ मार्च रोजी ISRO अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होईल आणि २३ मार्च रोजी परत येईल.त्याच्या या यशामुळे शिरगाव हायस्कूलचे नाव उजळले असून, भविष्यात तो विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष अरुणभाई कर्ले, उपाध्यक्ष संभाजी साटम, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.