देवगडच्या खोक्यात कर्नाटकचा आंबा..?

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 06, 2024 15:00 PM
views 1614  views

देवगड : देवगड मध्ये सद्या आंब्याचा हंगाम सध्या ऐनभरात असून, आवक वाढली आहे; मात्र जगभरात प्रसिद्ध असलेल्या हापूसच्या नावाखाली कर्नाटक व आंध्रचा कमी प्रतीचा आंबा ग्राहकांच्या गळ्यात मारला जात आहे.देवगड हापूस म्हणून लिहिलेल्या खोक्यांमध्ये इतर ठिकाणचा आंबा घालून तो विकून सर्वच ठिकाणच्या ग्राहकांची सर्रासपणे फसवणूक केली जात आहे. कोकण कृषी विद्यापीठासह चार संस्थांनी देवगड हापूसचे जी.आय. मानांकन घेतले असतानाही देवगड हापूस नावाने फसवणूक सुरू आहे. फळांचा राजा म्हणजे आंबा आणि या आंब्यांचा राजा म्हणून देवगड हापूस ओळखला जातो. त्यामुळे आंबा खायचा तर देवगड हापूसच,असे म्हटले जाते; परंतु खरा देवगड हापूस आणि बनावट देवगड हापूस असा दोन्ही प्रकारचा आंबा सध्या बाजारात मिळतो. बऱ्याचदा ग्राहकांना माहिती नसल्यामुळे त्यांची राजरोस फसवणूक ठरलेलीच असते.

देवगड येथील हापूसचे शास्त्रीय नाव अल्फोन्सा असे आहे. अल्फोन्सा या अधिकाऱ्याने पोर्तुगाल राजवटीत हा आंबा विकसित केला.नंतर त्याचे नाव हापूस असे पडले. खूप चवदार, गोड, सुगंध आणि रंग यामुळे तो ओळखता येतो.कोकण कृषी विद्यापीठा सह चार संस्थांनी हापूसचे वैशिष्ट्य सिद्ध करत जी. आय. मानांकन अर्थातच स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक मिळवला आहे. २०२८ पर्यंत त्यांना हापूस आंबा विक्रीचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे.त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या विचार केला तर हापूस आंबा विक्रीचा अधिकार त्यांना प्राप्त झाला आहे. कोकणातील पाच जिल्हे वगळता इतर कोणालाही देवगड हापूस म्हणून आंबा विकता येत नाही; अन्यथा संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकते.जीआय मानांकन कायद्यानुसार कारवाईचा अधिकार पोलीस उपाधीक्षक आणि त्यापुढील दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.असे असतानाही देवगड येथील शेतकऱ्यांकडून आंबा घेतल्याचे दाखवून दक्षिण भारतातील आंबा देवगड हापूस म्हणून विकला जात आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश,तसेच इतर ठिकाणी हापूस आंबा उत्पादित केला जातो; परंतु त्यामध्ये देवगड हापूसच्या आंब्याप्रमाणे वैशिष्ट्ये नसतात. सध्या देवगडातील हापूसचा दर सातशे ते एक हजार रुपये डझन असताना कर्नाटकचा दोनशे ते तीनशे रुपये डझनाचा आंबा देवगड हापूस म्हणून चारशे ते सातशे रुपयाला विकला जातोय. ग्राहकांची ही शुद्ध फसवणूक असूनही त्यावर कोणतीच कारवाई होत नाही.

हापूस आंब्याची लागवड रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग या जिल्हा सह प्रामुख्याने समुद्रकाठावरील इतर जिल्ह्यांतही केली जाते.त्यामध्ये कर्नाटकही अग्रभागी आहे. इतर जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटक, आंध्र व केरळ राज्यांमध्येही हापूस आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे, परंतु सिधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेली भौगोलिक परिस्थिती,तिथले वातावरण आणि जांभ्या दगडाच्या कातळात लावलेल्या आंब्याला येणारी चव वैशिष्ट्यपूर्ण आणि मधुर जिभेवर रेंगाळणारी असल्याने या हापूसने देवगड हापूस म्हणून आपली ओळख जगभरात निर्माण केली आहे.

मद्रास,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश हापूस आंबा ग्राहकांना देवगड हापूस म्हणून विकला जात असल्याच्या तक्रारी पनन विभागाकडे आल्या आहेत.इतर ठिकाणी पिकणारा हापूस आंबा देवगड हापूस म्हणून विकणा-यांवर कारवाई करावी, असे आदेश पणन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहेत. कृषी विभागाने फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांसह त्यांचे बॉक्स बनवणा-यांवरही कारवाई करणे अपेक्षित आहे.

देवगड हापूस म्हणून कोणत्याही पुड्ढे बनवणाऱ्या कारखान्यात खोक्यांची निर्मिती होते.देवगड हापूस म्हणून लिहिलेल्या खोक्यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आंबा भरून विकला जातो, खोक्यावर देवगड हापूस लिहिले म्हणून बरेच ग्राहक आंबे खरेदी करतात, परंतु आंबा खाल्ल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. देवगड हापूसला बाजारात असलेली मागणी पाहून इतर आंब्यांची विक्री देवगडच्या नावावर करून ग्राहकांची निव्वळ फसवणूक केली जाते.

 देवगड तालुक्यातील हापूस आंब्याच्या तुलनेत आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकातील आंबा लवकर पिकतो. तिथल्या वातावरणामुळे आंब्याचे उत्पादन लवकर निघत असल्याने तो देवगड हापुस आंब्याच्या तुलनेत लवकर बाजारात येतो. त्याचाच फायदा उठवत काही व्यापारी दक्षिणेकडून आणलेला आंबा देवगडच्या नावाने देवगड हापूस म्हणून बाजारात विकतात. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील काही भाग वगळता इतर ठिकाणी पिकणाऱ्या हापूस आंब्यालाही देवगड हापूस सारखी चव नाही.याशिवाय तिथे पिकणारा आंबा देवगडच्या हापूस च्या  तुलनेत खूप उशिराने पिकतो.