स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी सातत्य महत्त्वाचे : जयप्रकाश परब

फोंडाघाट महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 15, 2026 14:49 PM
views 20  views

कणकवली : स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी आत्मविश्वास आणि सातत्य आवश्यक आहे, असे मत जि. प. चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी व्यक्त केले. फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी श्री. परब बोलत होते. यावेळी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत, संस्थेचे ज्येष्ठ संचालक संजय आग्रे, संदेश सावंत, रंजन नेरुरकर, सुंदर पारकर, प्राचार्य डॉ. पुरंधर नारे आदी  उपस्थित होते. 

जयप्रकाश परब यांनी आपल्या खडतर जीवनप्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना संघर्ष, चिकाटी आणि सातत्य या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. एमपीएससी-यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी योग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि आत्मविश्वास अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  संजय आग्रे, डॉ. पुरंधर नारे, महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले.  

प्रास्ताविक रिया मेस्त्री हिन केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख कोमल मेस्त्री हिने करून दिली. सूत्रसंचालन नीता धुरी व रिया मेस्त्री हिने केले. महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल क्रीडा विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी सादर केला. पारितोषिक वितरण प्रा. विनोदसिंह पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सतीश कामत यांनी केले. त्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिमरन तांबे हिच्या एकपात्री नाटकाने सभागृहात भावनिक वातावरण निर्माण केले. चेतन डोंगरे याच्या विनोदी नाटिकेने मात्र प्रेक्षकांना पोट धरून हसवले. दीक्षा जाधव व सहकार्यांचे पारंपरिक कोळी नृत्य, मानसी बाणे हिच्या लावण्या तसेच रिया व प्रिया मेस्त्री यांच्या जोशपूर्ण नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाला रंगत आणत प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. यावेळी उत्कृष्ट सादरीकरण करणार्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून तसेच उपस्थित विद्यार्थ्यांकडून रोख पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.