करुळचे सेवानिवृत्त पोस्टमास्तर राजाराम कोलते यांचे निधन

डॉ. प्रशांत कोलते यांना पितृशोक
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 15, 2026 18:57 PM
views 27  views

वैभववाडी :  करुळ गावचे रहिवासी व भारतीय टपाल खात्यातील सेवानिवृत्त पोस्टमास्तर राजाराम गंगाराम कोलते (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने करुळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ते कसाल येथील फुफ्फुसविकार तज्ञ डॉ. प्रशांत कोलते तसेच वैभववाडी येथील ‘स्वरगंगा इलेक्ट्रिशियन’चे मालक संतोष कोलते यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, भाऊ, बहीण, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

राजाराम कोलते यांनी भारतीय टपाल खात्यात तब्बल तीस वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा आणि गडहिंग्लज येथे त्यांनी पोस्टमास्तर म्हणून कार्य केले होते. शांत, मनमिळावू व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर करुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.