
कणकवली : जंगम मालमत्तेच्या जप्तीसाठी गेलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तळेरे येथील येसूदास सुब्रम्हणी (वय ५०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी १०.४२ वाजता घडली. याप्रकरणी सुनील सावंत यांनी फिर्याद दिली आहे. सुनील महादेव सावंत (रा.बांधकरवाडी,कणकवली) हे कणकवली न्यायालयात कर्मचारी आहेत. मंगळवारी ते सकाळी साडे दहाच्या सुमारास तळेरे गावठाणवाडी येथे शिल्पा येसूदास पटेल यांच्या नावे असलेल्या जंगम मालमत्तेच्या जप्तीसाठी गेले होते. त्यावेळी शिल्पा यांचे पती येसूदास पटेल यांनी सुनील सावंत यांना शिवीगाळ केली. तसेच मालमत्ता जप्त केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे न्यायालयीन कामगिरी न बजावता श्री.सावंत हे मागे आले. त्यानंतर ही बाब आपल्या वरिष्ठांना कळवून सुनील सावंत यांनी येसूदास पटेल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार सरकारी कामात अडथळा आणणे तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यास ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी येसूदास याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.










