अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राची हानी

कणकवली न. पं. सभागृहात श्रद्धांजली ; नगरपंचायतीची बैठक तहकूब
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: January 28, 2026 13:42 PM
views 181  views

कणकवली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे देश व महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या प. पू. भालचंद्र सभागृहात आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना अजित पवार यांनी कणकवली शहराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. कणकवलीच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या अकाली निधनाने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थनाही पारकर यांनी केली.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या वतीने आयोजित शोकसभेत यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, न. पं. च्या मुख्याधिकारी गौरी पाटील, भाजपच्या गटनेत्या सुप्रिया नलावडे, शहर विकास आघाडीचे गटनेते रुपेश नार्वेकर, नगरसेवक संजय कामतेकर, राकेश राणे, सुमित राणे, गणेश उर्फ बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, मेघा सावंत, सुमेधा आंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, जयेश धुमाळे, संकेत नाईक, लुकेश कांबळे, सत्यजित उर्फ बाळू पारकर आदी उपस्थित होते.  अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, अजित पवार यांचा प्रशासनावर जबरदस्त अंकुश होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावी नेतृत्वाला मुकली आहे. वेळेचे महत्त्व ओळखून काम करणारे ते कडक शिस्तीचे नेते होते. नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे म्हणाले, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम अजित पवार यांनी केले. राज्यावर अनेक आर्थिक संकटे आली, मात्र अर्थमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला त्या संकटांतून बाहेर काढले. प्रशासनाची सूत्रे घट्ट हातात ठेवण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती.

नगरसेविका मेघा गांगण म्हणाल्या, सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणजेच खरे नेतृत्व. त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा आधारवड हरपला आहे. प्रशासन चालविण्याची त्यांची कार्यपद्धती आत्मसात करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शोकसभेच्या प्रारंभी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, सर्व नगरसेवक-नगरसेविका व मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी न. पं. चे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

न. पं. ची बैठक तहकूब

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे कणकवली नगरपंचायतीची नियोजित बैठक तहकूब करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. पुढील बैठक कधी घेण्यात येणार, याची माहिती नगरपंचायतीकडून नगरसेवकांना कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल नगराध्यक्ष संदेश पारकर व नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहिली.